चिखली (तालुका प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जोरदार रणनीती आखली जात असून, एकएक मत मिळविण्यासाठी मतदारांशी संपर्क साधला जात आहे. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, ‘नारळ’ चिन्ह घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनाही या निवडणुकीत उतरली आहे. हे उमेद्वार भाजप-शिंदे गटाला फटका देणार की महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार? याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत ‘लक्ष्मी’च्या दर्शनाची जबाबदारी कोण घेणार? हाही प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा आहे.
चिखली बाजार समितीत जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडी व भाजप-शिंदे गट असा दुहेरी सामना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांमुळे तिहेरी झालेला आहे. सर्वाधिक उमेदवार हे सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदारसंघात असून, दोन्ही बाजूने या मतदारांवर दोरे घातले जात आहेत. आ. श्वेताताई महाले यांनी प्रत्येक मतदारांशी वैयक्तिक संपर्क चालविला असून, त्या मतांची बांधणी करण्यात सद्या तरी आघाडीवर आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे राहुलभाऊ बोंद्रे यांनी परंपरागत राजकीय रणनीतीवरच भर दिलेला आहे. महाविकास आघाडीकडून प्रास्थपितांनाच संधी मिळालेली असल्याने, हे प्रस्थापित आपआपल्या परीने खिंड लढवीत आहेत. परंतु, विरोधक ‘लक्ष्मी’चे दर्शन देणार असल्याची चर्चा रंगत असल्याने आघाडीच्या उमेदवारांनीही आपआपल्या नेतृत्वाकडे ‘लक्ष्मी’च्या दर्शनाची सोय कशी करता येईल, याबाबत विचारणा केली आहे. परंतु, त्याबाबतची जबाबदारी अद्याप तरी कुणाला काही शब्द मिळेला नाही, अशी माहिती हाती आली आहे.
दरम्यान, निवडणुकीत प्रस्थापित पक्षांकडून प्रस्थापित उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात आल्याचा मुद्दा पुढे करून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेवून शेतकरी विकास पॅनल या निवडणुकीत नवा पर्याय देत आहे. शेतीशी नाळ जोडलेले हे कार्यकर्ते शेतकरीहिताच्या नव्या कल्पना व नव्या योजना घेऊन येत आहेत, अशी भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले कार्यकर्ते या निवडणुकीत उतरवलेले आहेत. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलकडून विनायक सरनाईक (सहकारी संस्था सर्वसाधारण), विनोद खरपास (ग्रामपंचायत सर्वसाधारण), नितिन राजपुत (सहकारी संस्था सर्वसाधारण), सतिष सुरडकर (ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक ), गौतम मघाडे (ग्रामपंचायत अनु. जाती/जमाती राखीव प्रवर्ग), आनंद बोंद्रे (व्यापारी व अडते मतदारसंघ) हे निवडणूक लढवित आहेत. या पॅनलला नारळ हे चिन्ह मिळाल्याने हे कार्यकर्ते प्रस्थापितांना नारळ देण्यात यशस्वी होतील की नाही, याबाबत राजकीय चर्चा होत आहे.
बुलढाणा, चिखली, लोणार, मेहकर, देउळगावराजा, मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव व खामगाव बाजार समित्यांच्या प्रत्येकी १८ प्रमाणे एकूण १८० जागांसाठी ही लढत होऊ घातली आहे. माघारीच्या अंतिम मुदतीत खोर्याने अर्ज मागे घेण्यात आले. माघारीनंतर खामगाव ( ५३) व चिखली (५०) मध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहे. याशिवाय, मलकापूर ४६, जळगाव ४०, देऊळगाव राजा ४२, मेहकर ४५, लोणार ४३, नांदुरा ४६ समितीमधील उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. या तुलनेत बुलढाणा (३९) व शेगाव (३८) मध्ये उमेदवारांची संख्या कमी आहे. यामुळे येथे सरळ लढत होणार आहे.
——————–