‘श्रीकृष्णा’ने दिली तथागत संस्थेला जागा दान; त्या जागेवर संस्था बसवणार बाबासाहेबांचा पुतळा!
बुलढाणा (संजय निकाळजे) – ‘मन’ प्रांजळ आणि दिलदार असले तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच अपयशी ठरत नाही, मग ते मन स्वतःबद्दल असो किंवा इतरांबद्दल..! तो यशाचे शिखरावर जात असतो, असाच मनाचा मोठेपणा दाखवून साकेगाव येथील श्रीकृष्ण निकाळजे यांनी स्थानिक तथागत बहुउद्देशीय संस्थेला आपल्या ताब्यातील जागा दान दिली. आणि सदर जागेवर आता संस्थेच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे सदर पुतळा बसण्यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी १३ एप्रिल २०२३ रोजी एका आदेशाने परवानगी देखील दिली आहे.
साकेगाव येथे जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची संकल्पना पुढे आली तेव्हा जागेचाही प्रश्न उदयास आला. मात्र कोणतीही आढेवेढे न घेता साकेगाव येथील श्रीकृष्ण दामोदर निकाळजे यांनी त्यांच्या ताब्यातील २५ चौरस फूट जागा तथागत बहुउद्देशीय संस्थेला खाजगी कामासाठी दान दिली. तसे दानपत्र सुद्धा लिहून दिले. या दानपत्रात त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची जागा सोडून उर्वरित मालकीची जागा जिची चतुर सीमा पूर्वेस कृष्णा निकाळजे यांची जागा, पश्चिमेस अरुण निकाळजे यांची जागा, उत्तरेस रस्ता असून दक्षिणेस कृष्णा निकाळजे यांची जागा आहे. सदर जागा साकेगाव गावठाण संस्थेच्या खाजगी कामासाठी दिली असून संस्थेच्या ताब्यात दिली आहे. असे नमूद करून त्यांनी सदर जागेवर माझा कोणत्याही प्रकारचा मालकी किंवा हक्क राहिला नाही. दान देण्यात येणारी मालमत्ता ही शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आदिवासी यांचे मालकीची किंवा मूळ कायद्याने प्राप्त किंवा न्यायप्रविष्ठ नाही. असेही त्यांनी नमूद केले आहे. सदर दानपत्रे त्यांनी तथागत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र केशवराव निकाळजे यांच्याकडे सुपुत्र केले आहे.
जिल्हाधिकार्यांचे आदेश…!
पुतळा उभारण्यासंदर्भात १४ मार्च२०२३ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे दाखल केला होता. तसेच ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र निकाळजे यांचेसह इतरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यामुळे संबंधितांनी जागेची पाहणी केली. त्यानुसार १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी साकेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची परवानगी देऊन तसे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे आता या जागेवर बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यात येणार असल्याची माहिती ग्रा.पं. सदस्य तथा तथागत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र निकाळजे यांनी दिली आहे. तर जागा दान देऊन श्रीकृष्ण निकाळजे यांनी सामाजिक दृष्ट्या एक वेगळा ठसा उमटवला आहे, हेही तितकेच खरे..!
————