बिबी (प्रतिनिधी) – शिक्षण विभागाच्या पहिले पाऊल या उपक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी मेळाव्यानिमित्त शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची बैलगाडीतून प्रभातफेरी काढून शाळेत जोरदार स्वागत करण्यात आले. येथून जवळच असलेल्या देऊळगाव कुंडपाळ या शाळेत गुरूवारी (दि.२०) हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजूभाऊ डव्हळे व प्रमुख पाहुणे सरपंच शेषराव डोंगरे हे उपस्थित होते तर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, उपसरपंच सर्व सदस्य, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हे याप्रसंगी हजर होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख रामप्रसाद कायंदे सर हे होते. त्यांनी उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन समाधान घुगे सर यांनी, तर मार्गदर्शन राम कांगणे सर व शिवाजी डोंगरदिवे सर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन श्री बाजड सर यांनी केले.
या उपक्रमाअंतर्ग केंद्रामधील सर्व शाळांनी उत्कृष्ट व आकर्षक स्टॉल लावले होते. तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक एक्टीव्हीटी घेण्यात आली व विद्यार्थ्यांना शाळापूर्व अनुभव देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गो. मा. पवार सर, संतोष आढाव सर, गणेश व्यवहारे सर, कु.सुमन राठोड, कु.शिल्पा गायकवाड, कु.कल्पना राठोड यांनी प्रयत्न केले. प्रसंगी केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होत्या. एकंदरीत जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा देऊळगाव कुंडपाळ येथे शाळापूर्व तयारी मेळावा प्रचंड आनंदात व उत्साहात संपन्न झाला.