सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – भरधाव असलेली इनोव्हा कार ओव्हरटेक करण्याच्या नादात चक्क समोरील ट्रकखाली घुसली व चिरडली गेली. समृद्धी महामार्गावरील सावरगाव माळ शिवारात शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातात ट्रकखाली कार चिरडून एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. काळजाचा थरकाप उडावा असा हा अपघात असून, कार चक्काचूर झाली होती. जखमींना तातडीने सिंदखेडराजा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर जालना येथे हलविण्यात आले.
सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ परिसरातील नागपूर कॉरिडॉरवर चॅनल नंबर ३४६.५ वर ही दुर्देवी घटना घडली. ट्रक क्रमांक यूपी-६१-एटी-२६०८ हा आपल्या साइडने जात असताना मागून भरधाव आलेल्या कार (क्र. एमएच-०२-एफइ-८८७६) चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार ट्रकवर चालकाच्या बाजूने मागच्या भागावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरील भाग अक्षरशः चुरा झाला. या अपघातात डॉ. अब्दुल खालीक (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अब्दुल हे मुंबईवरून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा या आपल्या मूळ गावी जात होते. कारमध्ये त्यांचे कुटुंबीय होते.
दरम्यान, डॉ. अब्दुल यांची मुलगी मुस्कान खालीक (२४) या गंभीर जखमी असून, मुलगा अमन व पत्नी अमरीन हे दोघेही या अपघातामध्ये जखमी आहेत. जखमींना जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, महामार्ग वाहतूक पोलिसांनी कारचालक दिनेश कुमार याने निष्काळजीपणे कार चालवून अपघात केल्याचे यासंदर्भातील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. महामार्ग पोलिस पथकाचे पोलिस निरीक्षक शैलेश पवार, पीएसआय उज्जैनकर, राणे, राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मदतकार्यात समृद्धी महामार्गावरील क्विक रिस्पॉन्स व्हेइकल स्टाफ व वैद्यकीय स्टाफने देखील मदत कार्यात हातभार लावला.
समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात गत तीन दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. १८ एप्रिलला नागपूरचे माजी रणजीपटू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी क्युरेटर प्रवीण हिंगणीकर हे जखमी झाले. या अपघातात प्रवीण हिंगणीकर यांची पत्नी जागीच ठार झाली. हा अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला होता. यानंतर आणखी एक हा अपपघात झाला आहे.
—————–