– शेतकर्यांचे पैसै घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा दिला इशारा
मेहकर (रवींद्र सुरूशे) – शेतकर्यांची फसवणूक करून पैसे देण्यास टाळाटाळ करणार्या व पसार झालेल्या अडत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी जानेफळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या अडत्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. शेतकर्यांच्या घामाचा दाम घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही डॉ. टाले यांनी दिला आहे.
परिसरातील फसवणूक झालेले शेतकरी व डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी काल जानेफळ पोलीस स्टेशन गाठून शेतकर्यांचे पैसै बुडवून पळून गेलेल्या अडते १) कैलास राधाकृष्ण ढवळे २) आशीष कैलास ढवळे ३) सौ. किरण कैलाश ढवळे सर्व राधाकृष्ण नगर देऊळगाव साकर्शा ता. मेहकर जिल्हा बुलढाणा यांनी देऊळगाव साकर्शा व परिसरातील ३०९ शेतकर्यांची फसवणूक केली असून, यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणेबाबत जानेफळ पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली. या तक्रारीत नमूद आहे, की कैलास राधाकृष्ण ढवळे, आशीष कैलास ढवळे व सौ.किरण कैलास ढवळे यांनी या भागातील शेतकर्यांची तीन महिन्यापूर्वी सोयाबीन खरेदी करून त्यांना आरटीजीएस करतो म्हणून सांगितले, व काही लोकांना बुलढाणा अर्बनचे खोटे चेक दिले व शेतकर्यांकडून माल खरेदी करून दुसरीकडे विक्री केला. तरीसुद्धा या शेतकर्यांचे पैसे अद्यापपर्यंत या व्यक्तींनी दिलेले नाहीत. तरी या परिसरातील असे ३०९ शेतकरी असून, त्यांची जवळपास ११ कोटीची फसवणूक झाल्याचे दिसून येते. तरी या आरोपींविरुद्ध फसवणुकीचा ४२० सह प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करून, फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी व शेतकर्यांचा मालाचे हक्काचे पैसे परत मिळण्यासाठी सहकार्य करावे. सदर व्यक्ती अवैधपणे सावकारी करत असतो, व शेतकर्यांना धमक्या देतो, तरी यापैकी एकाही शेतकर्याला काही झाल्यास संबंधित व्यक्ती जबादार राहतील, व कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नाही, यासाठी पोलिसांनी लक्ष घालावे. गावातील वातावरण सध्या खराब आहे.
सदर व्यक्ती हा शेतकर्यांना दमदाटी करतो. तरी यावर तात्काळ कार्यवाही करावी. यासाठी एक शोधपथक तयार करुन तात्काळ अटक करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी केली आहे. या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, सहाय्यक निबंधक मेहकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी देवेंन्द्र आखाडे, गोपाल सुरडकर, कैलास ऊतपुरे, सुरेश खरात, शिवाजी डव्हळे, प्रविण ऊतपुरे व पीडित शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.