– सहकारी संस्थांतून सर्वाधिक २७ उमेदवार रिंगणात
– आ.श्वेताताई महाले व माजी आ. राहुल बोंद्रे यांच्या राजकीय वर्चस्वाची लढाई
चिखली/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या चिखली बाजार समितीसाठी १८ जागांसाठी तब्बल ५० उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. ही निवडणूक चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासाठी वर्चस्वाची लढाई ठरली आहे. कुरघोड्यांचे राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून, सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वाधिक २७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, ग्रामपंचायत मदारसंघातही चांगलीच चुरश निर्माण झालेली आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप-शिंदे गट अशी दुहेरी निवडणुकीचे चित्र असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील या निवडणुकीत उतरल्याने मतदार कुणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांनी निवडणुकीत उतरणे टाळले असून, त्यातुलनेत आ. महाले गटाने तगडे उमेदवार उभे केले आहेत. एकूण ५० उमेदवार रिंगणात असले तरी, सहकारी संस्था मतदारसंघातून ११, ग्रामपंचायतमधून चार, अडते व व्यापारीमधून दोन व हमाल मापारीमधून एक उमेदवार निवडून द्यायचा आहे.
चिखली बाजार समिती उमेदवारांची अंतिम यादी येथे वाचा
चिखली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघातून अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून ४, आर्थिक दुर्बल घटकांतून तीन, सर्वसाधारण गटातून सहा असे १३ उमेदवार रिंगणात आहेत. व्यापारी अडते मतदारसंघातून सहा उमेदवार रिंगणात असून, सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वाधिक २७ उमेदवार रिंगणात आहेत. तर हमाल व्यापारी मतदारसंघातून चार उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक राजकीय पक्षसापेक्ष नसली तरी उमेदवार हे महाविकास आघाडी, भाजप, शेतकरी संघटना पुरस्कृत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व शिंदे गट असे दुहेरी निवडणूक चित्र निर्माण झालेले आहे.
राष्ट्रवादीच्या दिग्गजांची माघार; जिल्हा परिषदेवर लक्ष्य केंद्रीत करणार!
एकीकडे बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिखली तालुक्यातील दिग्गजांनी मात्र स्वतःहून उमेदवारी नाकारली आहे, तसेच आपले अर्जही मागे घेतले आहेत. या दिग्गजांना बाजार समितीपेक्षा जिल्हा परिषदेची उमेदवारी हवी असून, ‘उजाड गावाची पाटिलकी’ कोण करणार? असा राजकीय सुज्ञपणाचा विचार या दिग्गजांनी केला असल्याचे जाणवते आहे.
चिखली बाजार समितीसाठी महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांनी समन्वय साधला आहे. आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, राहुल बोंद्रे, प्रा. नरेंद्र खेडेकर या तिघांनी ही बाजार समिती जिंकण्यासाठी जोरदार रणनीती आखली आहे. बाजार समितीसाठी राष्ट्रवादीकडून सर्वाधिक इच्छुक होते. या सर्व इच्छुकांची तीन दिवसांपूर्वीच डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बैठक घेतली. या बैठकीत कोण निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही, अशी विचारणा त्यांनी केली असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. विकास मिसाळ, गजानन वायाळ, भिकन भुतेकर, सुनील खेडेकर या दिग्गजांनी स्वतःहून अर्ज माघे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार, त्यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता राष्ट्रवादीच्या चार जागांसाठी पाच अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामध्ये रामेश्वर खेडेकर (ग्रामपंचायत सर्वसाधारण), कृष्णा मिसाळ (सहकारी संस्था), बाळू पवार (सहकारी संस्था), विलास वसु (सहकारी संस्था) यांचा समावेश होता.
चिखली बाजार समितीची आर्थिक हालत खास्ता असून, बाजार समितीऐवजी शेतकरी आपला शेतमाल एमआयडीसीतील व्यापार्यांना परस्पर विकत असल्याने बाजार समितीचा सेस घटलेला आहे. तसेच, इतर आर्थिक उत्पान्नातही घट झालेली आहे. त्यामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तेथील कर्मचारीवर्गाचे पगारदेखील झालेले नाहीत. त्यामुळे बाजार समितीवर संचालक म्हणून गेल्यापेक्षा जिल्हा परिषद लढवू व जिंकू असा निर्धार या राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी केलेला दिसतो आहे. दुसरीकडे, ही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी जोरदार कंबर कसली असून, त्यांची राजकीय रणनीती तयार झालेली आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीत आ. श्वेताताई महाले विरुद्ध राहुलभाऊ बोंद्रे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष झडत आहे.
—————-