BuldanaChikhaliMaharashtraVidharbha

तणनाशक फवारल्याने सोयाबीन पीक जळाले

– कृषी अधिकारी म्हणतात, आधी तक्रार द्या, मग चौकशी करू
चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – शेतात उगलेल्या सोयाबीन पिकामध्ये तणाचे प्रमाण वाढल्याने मेरा बुद्रूक येथील शेतकरी हरिभाऊ पैठणे व सुधाकर पडघान यांनी सोयाबीनमध्ये ओडिसी आणि टरगा सुपर या तणनाशक औषधीची फवारणी केली. मात्र दुसर्‍याच दिवशी त्यांचे सोयाबीन पीक जळाल्याचे दिसून आले. या घटनेने शेतकरी चांगलेच हादरले असून, हा प्रकार पाहून लगेच तालुका कृषी अधिकारी शिंदे यांना फोन करून माहिती सांगितली असता, त्यांनी सांगितले की, अगोदर तक्रार द्या, नंतर आम्ही चौकशी करू, असे उत्तर दिले.
मेरा बु येथील शेतकरी हरिभाऊ किसन पैठणे यांची मेरा बु शिवारात गट ८३३, ८३४, तसेच सुधाकर कुंडलीक पडघान यांची गट न ९४४ व ९४५ मधील जमिनीमध्ये फुले संगम व किमया या सोयाबीनची पेरणी केली आहे. यावर्षी पाऊस दररोज पडत असल्याने सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर तणाची वाढ झाली. त्यामुळे या शेतकर्‍यांनी गावातील कृषी केंद्रामधून ओडिसी व टरगा सुपर तणनाशक ही औषधी आणून दुकानदार यांच्या सांगण्यावरुन सोयाबीनवर फवारणी केली. मात्र दुसर्‍या दिवशी शेतात जावून पाहिले असता फवारणी केलेली सोयाबीन पीक जळाल्याचे दिसून आले. त्यामुळे लगेच शेतकर्‍यांनी तालुका कृषी शिंदे, कृषी सहाय्यक गवई यांना फोनवर माहिती दिली. तेंव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आले की, आज रविवार असल्याने कोणीही येऊ शकणार नाही, म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी सोनुने यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की लवकरात लवकर बळीराजा कृषी केंद्रामधून स्टेज थ्री व व्हीगर राजा औषधी फवारणी करावी. सोयाबीन पीक जशाचे तसे होईल, असे सांगितले. यावेळी शेतकरी गजानन पैठणे, अमोल पडघान, विनोद पडघान, गणेश पडघान, एकनाथ डोगरदिवे, गजानन दातार, राजू पडघान, संतोष तोडे आदी जण हजर होते. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!