‘यूपी’चा कुख्यात गुंड अतिक अहमदची पोलिस संरक्षणात गोळ्या घालून हत्या!
– पत्रकार बनून आले तीन हल्लेखोर, घटनेनंतर पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
– काही दिवसांपूर्वीच यूपी पोलिसांनी अतिकच्या मुलाचाही केला होता इन्काउंटर
लखनऊ/नवी दिल्ली (आवेश तिवारी) – उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड व माफिया डॉन अतिक अहमद याच्यासह त्याचा भाऊ अशरफ अहमद याची पोलिस संरक्षणात पत्रकार बनून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. शनिवारी रात्री प्रयागराज येथे ही धक्कादायक घटना घडली. या दोघा भावांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस कोठडीतून बाहेर काढले होते. ते पत्रकारांशी संवाद साधत असताना अचानक पाठीमागून आलेल्या तीन हल्लेखोरांनी अतिकच्या डोक्याला बंदूल लावून गोळी झाडली, काही कळायच्याआत अशरफलाही गोळी घालण्यात आली. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर काही तासांतच या तिघांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या हत्येची जबाबदारी या तिघांनी स्वीकारली असून, लवलेश तिवारी (रा. बांदा), अरूण व सनी मौर्य (रा. हमीरपूर/कासगंज) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले असून, पोलिस त्यांची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेत पोलिस हवालदार मानसिंह यांनादेखील गोळी लागली असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
https://twitter.com/i/status/1647302227739176960
कुख्यात गुंड अतिक अहमद याच्या हत्येनंतर प्रयागराज परिसरात तणाव निर्माण झाला असून, जिल्हा दंडाधिकारी यांनी जमावबंदी लागू केला आहे. वडील व काकांच्या हत्येनंतर प्रयागराज कारागृहात बंद असलेला अतिकचा मुलगा अली अहमद हा बेशुद्ध पडला, अतिकचे आणखी दोन अल्पवयीन मुले सद्या बालसुधारगृहात असून, त्यांचे संरक्षण वाढविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर यूपी सरकारवर टीकेची झोड उठली असून, न्यायालयीन चौकशीची मागणी पुढे आली आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजचे पोलिस महानिरीक्षक प्रशांत कुमार यांना तातडीने पाचारण केले व त्यांना जाब विचारला. तसेच, वरिष्ठ अधिकार्यांचीदेखील तातडीने बैठक घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांनी तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती गठीत करून या हत्याकांडाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, या घटनेप्रकरणी १७ पोलिसांना सस्पेण्ड करण्यात आले असून, परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. घटनास्थळाचा पोलिस, फॉरेन्सीक टीमने पंचनामा करून पुरावे गोळा केले आहेत. तसेच, द्रूतगती पोलिस दलदेखील तैनात करण्यात आलेले आहे.
https://twitter.com/i/status/1647373535365713921
कुख्यात गुंड अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांना प्रयागराज कोर्टाने १३ ते १७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तेव्हापासून यूपी पोलिस व एटीएस या दोघांची खूनप्रकरणात चौकशी करत होते. या चौकशीत आपण पाकिस्तानकडून शस्त्रे आणल्याची अतिकने कबुली दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अहमदाबाद जेलमधून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संपर्क साधल्याचेदेखील त्याने सांगितले होते. तसेच, उमेश पाल याच्या खुनात सहभागी असल्याची कबुलीही त्याने दिली होती. अतिकचा मुलगा असद अहमद याची नुकतीच यूपी पोलिसांनी चकमकीत हत्या केली होती. त्यानंतर अतिकची तब्येत बिघडली होती. मुलाच्या अंत्यविधीसाठीदेखील पोलिसांनी त्याला सोडले नव्हते. १४ एप्रिलच्या रात्री त्याची तब्येत खराब झाल्यानंतर त्याला व त्याच्या भावाला पोलिस संरक्षणात रूग्णालयात नेण्यात आले होते. काल रात्रीही या दोघा भावांना पोलिस संरक्षणात रूग्णालयात नेण्यात येत असताना पत्रकार बनून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी लवलेश तिवारी, सनी आणि अरूण मौर्य यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्कारली, प्रयागराज पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. तसेच, या घटनेची न्यायालयीन चौकशीदेखील सुरू झाली आहे.