Pachhim MaharashtraSOLAPUR

साहेब, पाण्यासाठी चार किलोमीटरवर वणवण जावे लागतंय!

सोलापूर (संदीप येरवडे) – साहेब, पाण्यासाठी आम्हाला डोक्यावर घागर घेऊन चार- चार किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते. आमच्या गावाकडे आमदार लक्ष देत नाही. त्यामुळे काही करा, परंतु आम्हाला पाण्याची सोय करा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्याकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडातांडा येथील महिलांनी केली. घोडातांडा येथे जल जीवन मिशन योजनेचे काम मंजूर झालेले असताना अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. घोडातांडा येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत विहिरीचे काम मंजूर झालेले आहे. ते काम मे. तिरुपती कन्स्ट्रक्शन, मु. पो. शिवाजी नगर कारखाना रोड यांना मिळाले आहे.

कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडून कार्यारंभ आदेश देखील २७ जानेवारी २०२३ रोजी देण्यात आलेले आहे. परंतु हे काम आजतागायत मे. तिरुपती कंन्स्ट्रक्शन यांनी चालू केलेले नसल्यामुळे गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याकरीता वणवण भटकण्याची वेळ आलेली आहे. तरी तात्काळ या ठेकेदाराला काम चालू करण्याच्या सूचना द्यावे, अन्यथा बेमुदत आक्रोश आंदोलन व चक्री उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर यांनी पाहणी करून ठेकेदारांना काम करून सुरू करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, सोलापूरचे शहराध्यक्ष दशरथ चव्हाण, अध्यक्ष तालुका दक्षिण सोलापूर दशरथ राठोड, राजू बेळळनवरु, चरण राठोड यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!