– लग्नासाठी तरुणांनी दर्शवली विधवांना पसंती!
बुलढाणा (गणेश निकम) – एकेकाळी विधवांचे केस वेपन केले जायचे. तिला विद्रुप केले जात होते. शिवाय, सण समारंभात दुयमत्व होते. हे सर्व ती विधवा असल्यामुळे व्हायचे. आज आपण शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झालो आहोत. परंतु विधवांची स्थिती फारशी बदलली नाही. त्यांच्या जीवनात उजेड पेरण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डी.एस.लहाने यांनी केले. आयोजित मेळाव्याला आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यातही लग्नाळू मुलांनी विधवा महिलांना पसंती दर्शवल्याने हा मेळावा ऐतिहासिक ठरला.
परितक्त्या महिलांच्या लग्नासाठी सामाजिक जाणभाण असणारे प्राध्यापक डी एस लहाने यांनी पुढाकार घेताला अन आजचा मेळावा घडवून आणला. मेळाव्यात पाच दहा विधवांनी येण्याची हिम्मत केली तरी पुरेस असे सुरुवातीला मानले गेले. परंतु शेकडो लग्नाळू मुले व शेकडो विधवांच्या उपस्थितीने हा मेळावा ‘हिट’ ठरला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या काळात विधवांसाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच जयंतीदिनी हा मेळावा पार पडला हे विशेष.
सुरुवातीला महापुरुषांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर वसंतराव चिंचोले होते तर प्राध्यापक शाहीना पठाण, प्रतिभा भुतेकर, अश्विनी सोनवणे, रजनी पाटील, जगदेवराव बाहेकर, सुनील सपकाळ, दत्ता पाटील, पत्रकार गणेश निकम, डॉक्टर मनोहर तुपकर, पंडितराव देशमुख, समाधान देशमुख, नारायण मिसाळ, मनोज दांडगे, रामदास शिंगणे, गजानन गिरके, भगवान जाधव, बबन पाटील, बबनराव पवार, दौलत नरवाडे, गजानन काळवाघे, विनोद जाधव, मंदाताई भारब्दे आदींनी परिश्रम घेतले. शिवसाई परिवाराच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले.
—
व्यसनी वर नको रे बाबा, व्यसनमुक्तीची शपथ ठरली लक्ष्यवेधी
विधवा पुढे येणार नाही असे वाटत असताना अनेक विधवांनी लग्नासाठी परिचय तर दिलाच, शिवाय वर मुलगा गरीब असला तरी चालेल पण व्यसनी नको असा सूर त्यांच्या बोलण्यातून निघाला. या कार्यक्रमासाठी व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्राच्या डॉक्टर लता भोसले यांनी उपस्थित्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. यावेळी सर्वांनी उभे राहून कुठल्यही व्यसन न करण्याची शपथ घेतली. वाढती व्यसनाधीनता हा मोठा गंभीर सामाजिक मुद्दा आहे. लग्नासाठी जोडीदार शोधताना तो व्यसनी नसावा असे देखील विधवांनी बोलून दाखवले. मेळावे अनेक होतात, महात्मा फुले यांनी विधवांसाठी त्याकाळी कार्य केले. त्यानंतर शंभर वर्षांनी बुलढाण्यात होणारा आजचा मेळावा समाज परिवर्तनाची नांदी ठरला आहे.
—
आईच्या लग्नासाठी मुलाचा पुढाकार!
मुलं, अपत्य असल्यास महिला लग्न करत नाहीत. मुलांचे संगोपन करण्यासाठी त्या आयुष्य पणाला लावतात. विधवा आईच्या खास्ता पाहिलेल्या मुलाने आपल्या आईचे लग्न व्हावे यासाठी पुढाकार घेत तिचा संसार फुलावा यासाठी पुढाकार घेतला व आईचे लग्न लावून दिले. भोकरदन येथील त्या तरुणाचा सत्कारदेखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सर्वच वयोगटाची उपस्थिती!
वय वर्ष १९ ते वय वर्षे ४५ पर्यंतच्या विधवा महिलांनी यासाठी उपस्थिती लावली. तर २०-वर्षाच्या वरील ५५ वर्षाच्या वयस्क लोकांनी जोडीदाराचा शोध घेतला. उपस्थित लग्नाळुंच्या संपर्कातून काही संबंध जुळून आल्याचे आयोजकांनी सांगितले. जवळपास ३०० महिला व ५६० पुरुषांनी बायोडाटा सादर केला.
——————–