– आरोग्य अधिकारी, गावातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज!
चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – तालुक्यातील मेरा बुद्रूक येथील आरोग्य केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून रामभरोसे सुरू असल्याने दवाखान्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. आजुबाजूच्या महिला दवाखान्याच्या परिसरात घाण कचरा आणून टाकत आहे. या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन रुग्णांसह ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य पसरले असून, रुग्णालय प्रशासनाने त्वरित स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ केला पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
चिखली तालुक्यात १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या मेरा बुद्रूक गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून, या आरोग्य केंद्राच्या कुंपनाला लागूनच शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे आठशे विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच आजूबाजूला लहान मोठ्या घरांची वस्ती आहे. गावाची लोकसंख्या जास्त असल्याने आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर आणि मुख्यालयी आरोग्य सेविका असणे फार गरजेचे आहे. आरोग्य विभागाने आजारी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कर्मचारी वर्गाकरिता चांगल्या इमारती बांधून दिल्या आहेत. मात्र असे असतांनाही आरोग्य अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी आजारी रजेवर असल्याने दवाखान्यात औषध निर्माण अधिकारी अथवा आरोग्य सेवक काम करतात. रुग्णांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाची तोडफोड झाल्याने उघड्यावर लघुशंका करावी लागते, त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकामध्ये शाब्दिक चकमकीही पाहायला मिळते. त्यामुळे घाणीचे साम्राज्य आणि दवाखान्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचारीही येथे राहण्यास धजावत नाहीत. त्यामुळे कर्मचारी बाहेरगावाहून ये-जा करतात, या दवाखान्यात अनेक पदे रिक्त आहेत.
येथील गैरसोय पाहाता, आजारी रुग्ण आरोग्य केंद्रात न जाता खाजगी दवाखान्यात जावून आर्थिक भुर्दंडाला सामोरे जातात. आरोग्य केंद्र परिसरात वाढलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. एकीकडे गावात गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही विभागाचे सदस्य गावातीलच आहेत. त्याच बरोबर ग्रामपंचायत पदाधिकार्यांचे राजकीय वजनसुध्दा आहे. या अगोदरही गावातील अनेक नेते मंडळींनी महत्वाची राजकीय पदे भूषविलेली आहेत. मात्र असे असतांनाही गावातील आरोग्य विभाग रामभरोसे सुरू आहे. एकीकडे, शासनाने लाखो रुपये खर्च करून मेरा बुद्रूक येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची उभारणी केली. मात्र, या आरोग्य केंद्राकडे जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने पावसाळयात आरोग्य केंद्राच्या गेटमध्ये व ग्राउंडमध्ये घाणपाण्याचे डबके साचत असून, आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीसह कर्मचार्यांच्या निवासस्थानाला रानटी झाडेझुडपे तसेच गाजर गवताने वेढा घातलेला असतो. त्यामुळे या गवतात साप, विंचू यांना आश्रय मिळतो. त्यामुळे वरिष्ठ संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारातील घाण कचर्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी गावकर्याकडून होत आहे.