अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – जोराचा वारा व अवकाळी पावसामुळे दीडशे वर्ष जुने कडुनिंबाचे झाड टिनपत्र्याच्या सभामंडपावर कोसळून सात भाविक ठार झाल्याची दुर्देवी घटना अकोला जिल्ह्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थानात रविवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत १ गंभीर तर ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, झाड कोसळल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते. या घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे त्यासह शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशीरा मदत व बचावकार्य सुरू होते. या दुर्देवी घटनेबाबात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली असून, त्यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र : अकोला में बड़ा हादसा, टीन शेड पर पेड़ गिरने से 7 की मौत, 30 लोग घायल
◆ धार्मिक कार्यक्रम में शामिल होने गए थे लोग #Maharashtra | #Akola pic.twitter.com/Gy9dzfnFES
— News24 (@news24tvchannel) April 10, 2023
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथे बाबूजी महाराज संस्थानाचे मंदिर आहे. रविवार असल्याने संध्याकाळी आरतीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. आरतीनंतर अचानक सुरु झालेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात वारे वाहू लागले आणि वीज चमकू लागली. त्यातील वीज जुन्या कडुलिंबाच्या झाडावर कोसळली. वीज कोसळताच झाड टिनाच्या मोठ्या शेडवर कोसळले. त्यामुळे शेड कोसळ्याने त्याखाली असलेले भाविक दबले गेले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शेड खाली दबलेल्या लोकांना बाहेर काढून वाचविण्यात यश आले मात्र, सात लोकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे, तर अन्य लोक जखमी झाले असून, या सर्वांवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या दुर्घटनेत, मुरलीधर अंबारखाने (रा. पारस), अतुल आसरे (वय ३५ बाभुळगाव), पार्वतीबाई सुशीर (वय ५५ रा. भालेगाव बाजार, ता. खामगाव), उमा खारोडे (वय ५० दीपनगर, भुसावळ) इतर तीन मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु होते. तसेच रात्री उशिरापर्यंत शोध व बचावकार्य सुरु होते. रात्री उशीरा विभागीय आयुक्त निधी पांडेय, अमरावती विभागाचे पोलिस महासंचालक जयंत नाईकनवरे यांनी सर्वोपचारमध्ये जखमींची विचारपूस केली. वादळी वाचामुळे पारस येथे अनेक घरांवरील टिनपत्रांसह सौर ऊर्जेचे पॅनल उडाले. त्यापाठोपाठ अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने घरातील साहित्य भिजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.
बाबुजी महाराज संस्थानमध्ये रविवारी संध्याकाळी भक्त दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मंदिराच्या समोर असणार्या सभामंडपामध्ये टिनशेड खाली भाविक बसले होते आणि अचानक वादळ सुरु झाले. त्यानंतर काही भाविकांनी मंदिरामध्ये निवारा घेतला. तर टिनशेड खाली असलेले भाविक लिंबाचे फार जुने झाड पडल्यामुळे त्याखाली दबले.
– संदीप घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक
————–