बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील खामगाव तालुका आज ९ एप्रिल रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलाच झोड़पला. तालुक्यातील काही भागात जोरदार पावसासह गारपीट झाली. यामुळे कांदा टोळकांदा, आंबा, पपई व फळबागांचे मोठे नुकसान झाले. संकटामागून संकटे येत असल्याने शेतकरी पूर्णतः खचला आहे, तर शासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत सरसकट मदत त्वरित द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
जिल्ह्यातील काही भागासह ७ एप्रिलरोजी खामगाव तालुक्यात विजेच्या कड़कड़ाटासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये चितोड़ा येथील एकाचा अंगावर विजय पड़ून मृत्यू झाला होता. तसेच पळशी खुर्द येथील तिघांच्या सात बकर्या दगावल्या होत्या. तसेच संग्रामपूरमध्ये भिंत कोसळून मुलगी ठार झाली होती. जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यातही जोरदार अवकाळी पाऊस सुरूच होता. यामध्येही रब्बीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर आता एपिल महिन्यातही अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नाही. आज ९ एप्रिल रोजी संध्याकाळी खामगाव तालुक्यातील कारेगाव बु, चितोड़ा, अंबिकापूर, पिंप्री गवळीसह इतर भागात विजेच्या कड़कड़ाटात तुफान पावसासह गारपीटही झाली. यामुळे टोळकांदा, कांदा, मका, आंबा, पपई फळबागा तसेच वीटभट्टयाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा परिसरातही आज दुपारी पावसासह बारीक गारा पड़ल्या. नुकसानीमागे नुकसान सुरूच असताना शासनाकड़ून मात्र अद्याप कोणतीही मदत देण्याबाबतच्या हालचाली दिसत नसल्याचा आरोप करत शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत आता विरोधी पक्षांनी आवाज उठवण्याची गरज आहे.