चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – सेवा काळातसुद्धा गावात धार्मिक तथा अनेक सामाजिक कार्यात योगदान देणारे शंकर त्र्यंबक केदार यांनी सेवानिवृत्त झाल्यापासून गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन तथा स्वतः च्या शेतात ‘श्री’च्या मंदिराची स्थापना केली, त्याच बरोबर गावात विविध धार्मिक उपक्रम राबविल्या जात असल्याने शंकर केदार यांच्यावर गावकर्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चिखली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या दीड ते दोन हजार लोकसंख्येच्या गुंजाळा गावात ५० टक्के वंजारी आणि ५० टक्के बौध्द समाज आहे. पूर्वीपासून गावामध्ये दोन्ही समाजात एकोपा असल्याने सर्व धार्मिक अथवा महापुरुषांच्या जयंत्या मिळूनमिसळून साजर्या केल्या जातात. अशा या गावातील रहिवासी असलेले शंकर त्र्यंबक केदार यांनी सेवाकाळातसुद्धा गावात धार्मिक तथा अनेक सामाजिक कार्यात योगदान देत कामे केली. सेवानिवृत्त होवून चिखलीसारख्या शहरात घर बांधले मात्र गावासाठी चिखली शहर सोडून गावामध्ये गावकर्यांच्या सामाजिक कार्यासाठी गावात राहत आहेत. गावात राहून स्वत: च्या मालकीची पाच गुंठे जमीन गजानन महाराज मंदिरासाठी दान देवून त्यामध्ये स्व: खर्चाने भव्यदिव्य मंदिराचे बाधकाम केले तर दुसरीकडे गावाच्या सरकारी इ-क्लास जागेवर मारोती मंदिर बांधले आणि गावामध्ये पूर्वीचे असलेले हनुमान मंदीर, आई भवानी मंदिर, खंडोबा मंदिर, लोकवर्गणीतून बांधून आई भवानीच्या मंदिराच्या जागेवरील उच्च टेकडीवर कूपनलिका घेतली आहे. तिलाही चांगले पाणी लागल्याने एक मोठा आदर्श घडविला. त्यामुळे गावात मंदिराची स्थापना झाल्याने गावकर्यांना दर्शनासाठी आता बाहेर जाण्याची गरच राहली नाही.
एवढ्यावरच न थांबता वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी बौध्द समाजाला गौतमबुद्ध मूर्ती स्थापनेच्या वर्धापन दिनाला एक क्विंटल गहू देतात त्याच प्रमाणे आषाढी वारी, कार्तिकी वारी, राम जन्मोत्सव प्रगटदिन उत्सव यानिमित्त दरवर्षी कार्यक्रम साजरे करतात. तसेच मेव्हणा राजा, पिंपरी आंधळे, वैरागड येथील पायी जाणार्या दिंडीतील भाविक भक्तांना मुक्कामी ठेवून भोजनदान देतात. त्यांच्या सोबत मदतीला गावातील एकनाथ केदार, पांडुरंग केदार, हरिभाऊ नागरे, शिवाजी मास्तर, प्रल्हाद केदार तलाठी, सौदांजी केदार, अशोक थोरवे, शंकर गवनाजी केदार, सुधाकर वनवे तसेच आई भवानी मंदिर संस्थांचे सर्व सभासद हे नेहमी सेवा देत आहेत.