राज्यात ‘अवकाळी’चा धुमाकूळ; शेतकरी उद्ध्वस्त, सरकार अयोध्या दौर्यावर!
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत पोहोचले!
मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्यात वादळी पाऊस, गारपीट यामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असताना, चोहीकडे अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असताना, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार अयोध्या दौर्यावर गेले आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला गेले असताना, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत पोहोचले. सरकारमधील आमदार, मंत्रीही अयोध्येत गेले असल्याने ऐन संकटकाळात सरकारने शेतकरी व राज्य वार्यावर सोडल्याचे दुर्देवी चित्र आहे. या बाबत जनमाणसासह शेतकरीवर्गात तीव्र संतापाची लाट असताना, ज्येष्ठ नेते शरद पवार व शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सरकारच्या या बेपर्वा वर्तनावर सडकून टीका केली. राज्य संकटात असताना राज्याचे सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला गेले आहे. राज्याचे, देशाचे मुख्य प्रश्न सोडविण्यची दृष्टी ज्यांच्याकडे नाही, असे लोक लक्ष विचलीत करण्यासाठी असे काही तरी प्रकार करतात, अशा शब्दांत राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले. तर, ”हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाले आहे. हे ढोंग असून प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद यांना अजिबात मिळणार नाही”, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.
खा. संजय राऊत म्हणाले, की ”काल मी पाहत होतो की, अयोध्यातील साधू संतांनी शिंदे सरकाराला पाठिंबा दिला आहे. कालपर्यंत या साधू संतांचा आशीर्वाद उद्धव ठाकरे यांनाही होता. उद्या आम्ही मुख्यमंत्रीही होऊ, तेव्हा पुन्हा आम्हाला आशीर्वाद असेल.” दुसरीकडे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सरकारच्या बेपर्वा वर्तनाबद्दल खडेबोल सुनावले आहे. पवार आज नाशिक दौर्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की अयोध्या दौर्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा अजेंड प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आज अयोध्या दौरा महत्त्वाचा प्रश्न आहे का? राज्यात सध्याच्या घडीला अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, द्राक्ष उत्पादक हवालदील झाला आहे. पावसामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. हे सर्व अस्वस्थ करणारे आहे. मात्र, सत्ताधार्यांना त्याची चिंता नाही. अयोध्येच्या प्रश्नापेक्षा राज्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, आज राज्याचे सर्व मंत्रिमंडळ, आमदार, खासदार अयोध्येला जाऊन बसले आहेत. याचा अर्थ मूळ प्रश्नांना त्यांना बगल द्यायची आहे, असे पवार म्हणाले.
शिंदे म्हणत आहे की, आमची श्रद्धा असल्यामुळे आम्ही अयोध्येत आलो. मात्र, ते राज्यकर्ते आहेत. त्यांना जायचेच असेल तर त्यावर काही बोलता येणार नाही. मात्र, आमची श्रद्धा ही शेतकर्यांप्रती आहे. अवकाळीमुळे शेतकर्यांचे जे नुकसान होत आहे, त्याप्रती आम्ही संवेदनशील आहोत. शेतकर्यांच्या डोळ्यातील पाणी कसे पुसता येईल?, त्यांना संकटात मदत कशी करता येईल?, याचा विचार केला पाहीजे.
– शरद पवार, ज्येष्ठ नेते
तर, खा. संजय राऊत म्हणले की, महाराष्ट्राचे प्रश्न वार्यावर सोडून आपण (शिंदे-फडणवीस सरकार) गेलेला आहेत. प्रभू श्रीराम तुम्हाला (शिंदे-फडणवीस सरकारला) सुबुद्धी देओ. ”अयोध्या हे आता पर्यटन धार्मिक तीर्थस्थळ आहे. आम्हीही जात असतो. आम्ही त्यांना रस्ता दाखवला. आम्ही त्यांना प्रभू रामाचे महत्व समजून सांगितले. सत्ता असते तोपर्यंत जयजयकार होतोच. आम्ही ही जेव्हा जाऊ, तेव्हा अयोध्याची जनता आमच्या पाठीशी उभी राहील. मात्र ती जागा राजकारणाची नाही.”
राज्यात चोहीकडे गारपीटीने शेतीपिकांचे अतोनात नुकसान, शेतकरी उद््ध्वस्त
सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील खुडुस, अकलुज यासह पश्चिम भागातील गिरवी, माळशिरस, भांब परिसरात आज संध्याकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे ज्वारी, मका, डाळिंब, द्राक्षे सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही भागातदेखील काल सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर येडशी आणि कळम तालुक्यातील शिराढोण लोहटा आणि काही भागात गारपीटही झाली. नगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांनाही गारपिटीचा तडाखा बसला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते, तर माणगावात सोसाट्याचा वारा आणि गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.
विदर्भ, मराठवाड्यात आज पुन्हा पाऊस!
राज्यात येत्या तीन दिवसात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज असून, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच काळात पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज असून, यलो अॅलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या ३६ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. याच काळात कोकणातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
——————