जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा
देहू (अर्जुन मेदनकर) – आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा करण्यात आली असून, यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. २८ जूनरोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे. पालखी सोहळ्याचे प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली. देहू देवस्थान संस्थानाने याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला.
संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडून ३३८ व्या पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा यंदा १० जून रोजी होणार आहे. १९ दिवसांचा प्रवास करून हा पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल. २९ जून ते ३ जुलै रोजी हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी दिली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, पालखी अजित महाराज मोरे व विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आदी उपस्थित होते.
तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार!
आषाढी एकादशीच्या सोहळ्यात २९ जूनला तुकोबांची पालखी सहभागी होणार आहे. आणि याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येणार्या वर्षभरात पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. तसेच येथून जाताना वारकर्यांचे पाय भाजू नये याची काळजी घेतली जाणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
—–
पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
शनिवार दि. १० जूनला पालखी प्रस्थान दु. २ वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात.
रविवार ११ जूनला पालखी सकाळी १०.३० वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसर्या मुक्कामासाठी रवाना .
सोमवार १३ जूनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी.
मंगळवार १३ जूनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी.
बुधवार १४ जून लोणीकाळभोर,
गुरूवार १५ जूनला यवत,
शुक्रवार १६ जून वरवंड,
शनिवार १७ जून उंडवडी गवळ्याची,
रविवार १८ जून जुन बारामती,
सोमवार १९ जून सणसर,
मंगळवार २० जून आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम,
बुधवार २१ जून निमगाव केतकी,
गुरूवार २२ जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम,
शुक्रवार २३ जून सराटी,
शनिवार २४ जून रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि मुक्काम अकलुज.
रविवार २५ जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण आणि रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम.
सोमवार २६ जून रोजी सकाळी धावा व रात्री पालखीचा पिराची कुरोली येथे मुक्काम.
मंगळवार २७ जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम.
बुधवार दि. २८ जून रोजी पालखी वाखरी वरून पंढरपुरात दाखल.
गुरुवार २९ जून रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान (मंदिर) येथे मुक्कामी.
—