बुलढाणा (गणेश निकम) – जिल्ह्यातील चार तालुक्यांत काल अवकाळी पाऊस बरसला. त्यातही खामगाव तालुक्याला वादळी पाऊस व गारपिटीचा जबर तडाखा बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १२०० हेकटरवर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या तडाख्याने जवळपास बाराशे हेक्टरवरील बहरलेली पिके आडवी झाली असून, हजारो शेतकर्यांच्या आशा अपेक्षाही उद्ध्वस्त झाल्या आहेत.
जिल्ह्यात ७ एप्रिलला सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान काळेकुट्ट ढग दाटून आले अन् रिपरिप पावसाला सुरुवात झाली. वादळी वार्यासह आलेल्या अवकाळी पावसाने खेडोपाड्यात कहर केला. विजांनी खामगाव तालुक्यातील एका शेतकर्यांसह ७ बकर्यांचे बळी घेतले. संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथे मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळून एका बालिकेचा मृत्यू झाला. वादळी वार्यांनी आणि अवकाळी पावसाने तब्बल १२०० हेक्टरवरील पिके व भाजीपाला आडवा केला. यामध्ये गहू, ज्वारी, सूर्यफूल, मका या पिकांचा समावेश असल्याचे यंत्रणांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. याचा जबर फटका कांदे व बियाणांचे कांद्याला बसल्याचे चित्र आहे. तीन घरांची पडझड झाली असून, एक घर जमीनदोस्त झाले आहे.
अवकाळीचा धोका कायम
वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्याच्या नागपूर केंद्राने वर्तविला आहे. येत्या २४ तासांत या जिल्ह्यात ४० ते ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहणार आहे. तसेच सर्वदूर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी गारपिटीचा धोका कायम असल्याचे नागपूर केंद्रातर्पेâ स्पष्ट करण्यात आले आहे.
कांदा पिकाला फटका
अवकाळी पावसाने ११२० हेक्टरवरील पिके व भाजीपाला उद््ध्वस्त केला असून, याचा जबर फटका कांदा व बियाणांचे कांद्याला बसला आहे. चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे भरत सावळे व अनिल सावळे यांच्या शेतातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
असा झाला पाऊस
खामगाव तालुक्यात ३५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याखालोखाल बुलडाणा २०.५ मिमी, संग्रामपूर १४.३ मिमी, चिखली १२.९ मिमी, मोताळा १७.३ मिमी, नांदुरा ११ मिमी, शेगाव ९ मिमी, देऊळगाव राजा ६ मिमी, मलकापूर २.५ व मेहकर १ मिमी या तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
विदर्भातील सहा जिल्ह्यात ‘अॅलर्ट’!
बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील सहा जिल्ह्यांना नागपूर हवामान खात्याच्या केंद्राने इशारा दिला आहे. यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामुळे हजारो शेतकर्यांची चिंता कायम असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
————–