Head linesKARAJATPachhim Maharashtra

हे सरकार कसले? ही तर टोळी; टोळीचा एन्काऊंटर होत असतो – खा. संजय राऊत

कर्जत (प्रतिनिधी) – ‘ज्याचे हृदय जळते, तोच पत्रकार जनतेचे मत मांडू शकतो, ही वास्तविकता आहे. समाज परिवर्तन करण्याची ताकद ही पत्रकारांमध्ये आहे. आज मात्र ‘देशच भांडवलदारांच्या हातामध्ये गेला आहे, न्यायालय जनतेचे राहिले नाहीत, ज्या स्वायत्त संस्था आहेत, त्यासुद्धा स्वायत्त राहिल्या नाहीत, वृत्तपत्राचे मालक हे कोणा एका व्यक्तीच्या अधीन गेले आहेत. संसदेला टाळे लागले आहे, प्रशासन हे गुलामासारखा पायरीवर बसलेला आहे. हे सर्व पाहता समाजाला आता दिशा देण्याचे काम हे पत्रकारांना करायचे असून, पत्रकारांनी आता जे काही सत्य आहे, ते समाजापुढे मांडले पाहिजे. क्रांतीची ठिणगी ज्या विचारातून पडली, तो पत्रकारांचा विचार आज तेवत राहिला पाहिजे,’ असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. हे सरकार कसले? ही तर टोळी आहे. टोळीचा एन्काऊंटर होत असतो, जनताच एन्काऊंटर करेल, असा घाणाघात राज्य सरकारवर केला.

नगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळाव्याचे आयोजन शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख हे होते. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गणेश जेवरे यांनी स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष उषा राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर कार्यक्रमाला विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठल लांडगे, परिषदेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, जान्हवी पाटील, प्राचार्य डॉ.संजय नगरकर, संयोजन समितीचे उपाध्यक्ष आशिष बोरा, उपाध्यक्ष योगेश गांगर्डे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी आदी उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेचे एस एम देशमुख म्हणाले की, पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत पण राज्य शासन हे प्रश्न सोडवण्यामध्ये उदासीन आहे. ‘आज पत्रकारांवर हल्ले वाढत चाललेले आहेत. जो काही कायदा केला आहे, त्याचा म्हणावा असा उपयोग होत नाही. भविष्यामध्ये हा कायदा अधिक कडक करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणे गरजेचे आहेत. पत्रकारांच्या बाबतीत रेल्वे प्रवासामध्ये जी सवलत देण्यात आलेली होती, ती बंद करण्यात आलेली आहे, ती तात्काळ सुरू करावी, यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी प्रयत्न करावेत. तसेच पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे, हा ही प्रश्न मार्गी लावावा, असे ते म्हणाले. आमदार रोहित पवार यांनी ‘पत्रकारांच्या अनेक संघटनाबाबत चिंता व्यक्त करताना सर्व संघटना एकत्रित आल्या पाहिजे. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त करताना पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये लिखाण्याला स्वातंत्र्य होते. आंदोलने झाली त्याबद्दल पत्रकारांनी खुले पणाने लिहिले दाखवले त्यामुळेच या देशांमध्ये बदल घडला हे सुद्धा मान्य केले पाहिजे. असे म्हणत आजच्या पत्रकारितेबद्दल त्यावरील बंधनाबाबत बोलताना पत्रकारांनी आगामी काळामध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून जे काही घडत आहे, ते सत्य जनतेसमोर आणावं व आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये काय आहे, ते सांगावं. जनतेचे प्रश्न त्या माध्यमातून सुटतील, असे ते म्हणाले. आज मीडियाचे स्वरूप बदलत चाललेले आहे. आज राजकारणामध्ये जे जे काही वेगळं चाललेलं आहे, त्या संदर्भात सुद्धा पत्रकारानी लिखाण केलं पाहिजे, आजच्या काळात पत्रकारांनी ठाम भूमिका घेण्याची गरज असल्याचे म्हणताना ‘आज खरच प्रेस प्रâीडम राहिला आहे का? हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तुमचे जे काही प्रश्न आहेत, त्याच्या पाठीशी आम्ही राजकीय मंडळी निश्चितपणे उभे राहू,’ अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.

खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘आणीबाणीच्या कार्यकाळात इंदिरा गांधी समोर कोणी झुकले नाहीत, मात्र आता मालकच सत्याधार्‍यासमोर झुकत आहेत व थेट खासदारही होत आहेत. आज एका व्यक्तीच्या भोवती हे वृत्तपत्र फिरत आहेत, ही अत्यंत भयंकर बाब आहे असून पत्रकारांची परंपरा आहे तीच आपल्याला पुढे न्यायची असेल, तर आपल्याला जे काही सत्य आहे , ते जनतेसमोर मांडलं पाहिजे,’ अशी अपेक्षा व्यक्त करताना मी जरी राजकारणात असलो तरी लोकांनी मला पत्रकार म्हणूनच ओळखावं अशीच इच्छा आहे. वृत्तपत्र क्षेत्र केवळ अडचणीत नाही तर वृत्तपत्र क्षेत्राच हवन सुरू आहे. सध्याची परिस्थिती पाहून ज्याचे हृदय जळते त्यानेच स्वतःला पत्रकार समजावे. क्रांतीरसाच्या चिळकांड्या कुठून उडू शकतील तर त्या लेखणीतूनच उडू शकतात. सध्या ९० टक्के मीडिया हा भांडवलदाराच्या ताब्यात आहेत… या देशात न्यायालय जनतेची राहिली नाहीत, न्यायालयात जनतेला न्याय मिळेल का याची शंका आहे. असे खासदार राऊत म्हणाले. आज बोलण्यावर निर्बंध आहेत, लिहिण्यावर बंधन आहेत. वृत्तपत्राचे संपादक, टीव्ही चॅनेलचे संपादक यांचाr नेमणूक राजकीय नेतेच करत आहेत. महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. ते संस्कार बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आमच्यावर झाले असल्याने आम्ही वाकायला आणि झुकायला तयार नाही, असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील पत्रकार ही अन्याय विरोधात लढणारी फौज आहे. पत्रकारांना पत्रकारिता करु द्यावी, मालकांनी एजंटगीरी करायला लावू नये. असेही संजय राऊत म्हणाले.
शेवटी कार्यक्रमाचे आभार परिषदेचे अहमदनगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले, तर यावेळी राज्य सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मन्सूरभाई शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कर्जत शहरात श्रमदान करणार्‍या सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीचा ही सत्कार करण्यात आला.


मराठी पत्रकार परिषदेने दिलेल्या पुरस्काराचे मानकरी तालुके पुढील प्रमाणे –
– नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ, जिल्हा भंडारा
– अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती
– लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ, जिल्हा हिंगोली
– नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव
– पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ, जिल्हा पुणे
– कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली
– छत्रपती संभाजीनगर विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
– कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा रायगड
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!