– संग्रामपूरमध्ये भिंत पडून चिमुकली तर खामगावात वीज पडून शेतकरी ठार
– वीज पडल्याने आठ बकर्याही दगावल्या
बुलढाणा (बाळू वानखेडे) – हवामान खात्याने वर्तविलेला अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. बुलढाणा जिल्ह्यात खामगावसह तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या हाती आलेले पीक हिरावले गेले. याशिवाय, अनेक ठिकाणी जीवितहानीदेखील झाली. बुलढाणा जिल्ह्यात दोन बळी या अवकाळी पावसाने घेतले आहेत.
बुलढाण्यात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. यात संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथील गणेश बोरकर यांच्या घराची भिंत कोसळून त्याखाली दोन मुली दबल्या गेल्या. कृष्णाली आणि राधा असे या मुलींची नावे आहेत. घटनेनंतर गावकर्यांनी तात्काळ मदतकार्य केले आणि दोघींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी दोन वर्षीय कृष्णाली हिला तपासून मृत घोषित केले तर राधावर सध्या उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. खामगाव तालुक्यात शुक्रवारी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने पिकांसह जीवितहानीही केली. अंबिकापूर शिवारातील शेतात काम करणारा चितोडा येथील ४० वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. तर पळशी खुर्द येथील मृत बकर्यांचा शवविच्छेदन अहवाल पशुसंवर्धन विभागाकडून मागविण्यात आला आहे. त्यानंतर मदत दिली जाईल, असे प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पाटोळे यांनी सांगितले.
खामगावात तालुक्यातील अंबिकापूर व पळशी खु. शिवारात आज विजेच्या कड़कड़ाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, अंबिकापूर शिवारात अंगावर वीज पड़ल्याने चितोड़ा येथील शेतकरी गोपाल महादेव कवळे (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्या घटनेत वीज पड़ून पळशी खुर्द येथील वसंत इंगळे व इतरांच्या आठ बकर्याही दगावल्या. बुलढाणा, खामगाव, शेगाव, मेहकर, चिखली, सिंदखेडराजा आदी तालुक्यांतही अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, शेतीपिकांचे नुकसान केले आहे.
——————