बुलढाणा (प्रशांत खंडारे) – जिल्ह्यात महिला अत्याचारांच्या घटना नव्या नाहीत. कुठून तरी महिला अत्याचाराचा घटना समोर येत असतात. पोलीस यंत्रणा महिला अत्याचारांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण तरी ही या घटना थांबता थांबत नाही. विशेष म्हणजे, आता तर महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचे नवे संकट उभे राहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मिसिंगच्या घटनेत वाढ होताना दिसते.४ एप्रिलला बुलढाणा शहरातील आनंदनगर येथे माहेरी राहणारी विवाहिता दुर्गा गौतम खिल्लारे व तालुक्यातील डोंगर खंडाळा येथील कांचन विशाल चव्हाण ही विवाहिता मावशीच्या घरून निघून गेल्याची तक्रार समोर आली आहे. त्यामुळे बेपत्ता होण्याचा विषय चिंतेत पाडणारा आहे.
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अल्पवयीन मुली तरुणी आणि महिला बेपत्ता होत आहेत. बेपत्ता होण्याची कारणे विविध आहेत. बेपत्ता होण्यामागे पतीसोबत भांडण करून घर सोडून जाणे, प्रेम प्रकरणातून पळून जाणे, रागाच्या भरात घरातून निघून जाणे ही कारणे प्रामुख्याने समोर येत आहेत. अनेक कुटुंबांमध्ये अनपेक्षित इच्छा-अपेक्षा, वैचारिक मतभेद आणि इतर कारणांवरून लहान-मोठे वाद होत असतात. परंतु अशा परिस्थितीत संतापाच्या भरात परिवाराला सोडून जाण्याच्या घटना वाढत आहेत. अनेक लहान मोठ्या कारणांवरून पती-पत्?नीतील वाद विकोपाला जातात. टोकाची भूमिका घेतली जाते आणि सततच्या वादाला कंटाळून महिलांनी घर सोडल्याचे प्रकार घडतात. नवर्याच्या त्रासाला कंटाळून अनेक महिला घरून निघून जातात. तरुण-तरुणींच्या प्रेमात कुटुंबीयांचा अडसर होत असेल, तर थेट पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला जातो. स्वप्नरंजक आश्वासने देऊन तरुणी किंवा महिलांना पळवून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. फूस लावून पळवून नेण्याचे प्रमाण तरूण मुलींमध्ये अधिक आहे.गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यात जवळपास १६ ते २५ वयोगटातील २६ मुली, तरुणी बेपत्ता झाल्याची आकडेवारी होती. त्यानंतर बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी पुण्यातून परत आणलेली नांद्राकोळीची १६ वर्षीय मुलगी चक्क सहा महिन्याची गर्भवती निघाली तर तिला पळवून नेणारा चक्क दोन लेकरांचा बाप निघाला. बेपत्ता होण्याची खरी आकडेवारी समोर येत नाही. खरे तर पालकांनी मुला मुलींवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आपली मुलगी कुणाशी मोबाईलवर बोलते ? कुठे जाते? तिचे मित्र मैत्रीण कोण आहे? मित्र मैत्रिणींशी तिचा संवाद संशयास्पद आहे का? हे बघण्याची जबाबदारी पालकांची असते. अतिविश्वास किंवा कामातील व्यस्तता त्यांना नडते आणि दुष्परिणाम समोर येतात. पालकांनी मुलींकडे संशयाच्या नजरेने पहावे असे नाही परंतु किमान काळजी घेणे गरजेचे आहे.
दोन विवाहिता बेपत्ता!
बुलढाणा शहरातील आनंदनगर येथील माहेरी राहणारी विवाहिता दुर्गा गौतम खिल्लारे व तालुक्यातील डोंगर खंडाळा येथील कांचन विशाल चव्हाण ह्या दोन्ही विवाहिता चार एप्रिल रोजी घरून निघून गेल्या आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली. बुलढाणा शहरातील आनंदनगर येथील आशा राहुल गवई यांनी फिर्याद दिली आहे. त्या म्हणाल्या की, मी पतीसह आनंदनगर येथे राहते. मी मजुरी काम करते.मला रेणुका व दुर्गा ह्या दोन मुली व एक मुलगा आहे. दुर्गा ही मोठी मुलगी असून तिचे लग्न केळवद येथील गौतम खिल्लारे यांच्यासोबत २०२० रोजी झाले. त्यांना युवराज नावाचा दीड वर्ष मुलगा देखील आहे. परंतु जावई आणि मुलीचे वाटत नसल्यामुळे मुलगी दुर्गा बुलढाणा येथे माहेरी राहते.३ एप्रिल रोजी कोलवाडे ते पतीसह मी महादेव दर्शनासाठी गेली होती. घरी परतल्यावर दुर्गा घरातील कपडे घेऊन घरून निघून गेली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. तर दुसर्या घटनेमध्ये डोंगर खंडाळा येथील विशाल चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे की, २०२२ मध्ये सोबत लग्न झाले.२३ एप्रिल रोजी कांचन ची मावशी शोभा जाधव यांच्या घरी कोलवड येथे जाण्यासाठी मोटारसायकलने धाड नाका बुलढाणा येथे गेलो होतो. सकाळी कांचन मावशीच्या घरी वलवड येथे जाते म्हणून निघून गेली. परंतु ती मावशीच्या घरी पोहोचलीच नाही, असे फिर्यादीत विशाल चव्हाण यांनी म्हटले आहे.
मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक!
जिल्ह्यात महिला आणि तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे, घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये यासाठी कित्येक मुलींचे कुटुंबीय पोलीस ठाण्याला तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे बेपत्ता होणार्या मुलींची खरी आकडेवारी बाहेर येणे शक्य नाही. यापैकी काही तरुणी आणि महिला घरी परतल्या असतील. काही पळून गेल्यानंतर लग्न करुन परतल्या असतील किंवा आई-वडिलांच्या संमतीने त्यांचे पळून गेलेल्या मुलांसोबत लग्न लावून दिले असेल. पण, ज्या मुली आणि महिला घरी परतल्याच नाही त्यांचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता लागलेला नसल्याने चिंतेचे ढग अजून गडद झाले आहे.
——————–