तीन वर्षापासून बंद केलेली ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ पुन्हा सुरू!
बुलढाणा (संजय निकाळजे) – शेतकर्यांना फायदेशीर असणारी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना गेल्या तीन वर्षापासून बंद करण्यात आली होती. परंतु ती आता पुन्हा सुरू करण्यात आली असून, यामध्ये १६ बहुवार्षिक फळबागांच्या लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान शेतकरीबंधूंना देण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना फळबाग लागवड शेतीसाठी आवश्यक असणारे यंत्रसामग्री खरेदी, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनांच्या माध्यमातून ठिबक व तुषार सिंचनासाठीदेखील मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असून, फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून खड्डे खोदणे, फळांची कलमे व रोपांची लागवड करणे, पीक संरक्षण तसेच नांग्या भरणे व ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठी १०० टक्के अनुदान देय आहे.
शेतकर्यांना यासाठी स्वखर्चाने जमीन तयार करणे, फळबागांचे अंतर मशागत तसेच काटेरी कुंपण, शेणखत आणि सेंद्रिय खत मिश्रणाचे खड्डे भरणे, रासायनिक खत देणे इत्यादी सर्व स्वखर्चाने करणे गरजेचे असते. या योजनेच्या माध्यमातून शेतीपुरक बाबींसाठी शेतकर्यांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यात येते. जेणेकरून शेतकर्यांना शेती करणे सोपे जावे व त्याची आर्थिक उन्नती व्हावी, हा त्यामागचा शासनाचा दृष्टिकोन असतो. या पार्श्वभूमीवर जर शेती पद्धतीचा विचार केला तर आता बरेच शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले असून, फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठीदेखील कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. विदर्भामध्ये प्रामुख्याने संत्रा, मोसंबी तसेच कागदी लिंबू, आवळा आणि सीताफळ इत्यादी फळबाग लागण्यासाठीदेखील अनुदान मिळत असल्यामुळे विदर्भातील शेतकर्यांनादेखील याचा खूप मोठा फायदा होणार आहे. फळबाग लागवडी करिता किमान ०.२० हेक्टर ते कमाल सहा हेक्टरपर्यंत शेतकरी इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळ पिकांची लागवड करू शकतात. गेल्या तीन वर्षापासून बंद करण्यात आलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे शेतकर्यांना त्याचा लाभच होणार आहे.