बुलढाणा: तालुक्यात व शहरात अवैध हातभट्टी दारूचा महापूर वाहतोय. राज्य उत्पादन शुल्क वेळोवेळी कारवाई करते. ४ व ५ एप्रिल रोजी शहरातील भिलवाडा, कैकाडीपूरा व येळगांव, देऊळघाट, पाडळी या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली. दरम्यान, १ लाख २७ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बुलढाणा शहर व तालुक्यात गावठी दारू जोमात विकली जात आहे. या गावठी दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडत असून कायमस्वरूपी दारूची अड्डे उध्वस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करते परंतु पुन्हा गावठी दारूचे अड्डे सुरू होतात. चार व पाच एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकांनी धडक कारवाई करत, अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १३ गुन्हे नोंदवून १८८ लिटर हातभट्टी दारू,४,६९१ लिटर सडवा असा१ लाख २७ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक के. आर. पाटील, ए.आर.अडळकर, निलेश देशमुख, अमोल तिवाने, अमोल सोळंके, नितीन सोळंके, एम. एस. जाधव,चव्हाण, पिंपळे, राजू कुसळकर यांनी केली.