बुलढाणा (खास प्रतिनिधी) – पाणीटंचाईचा शाप लाभलेल्या नजीकच्या देऊळघाट येथील एका बालिकेचा खोल विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला. ही आठवर्षीय जखमी बालिका मृत्यूशी झुंज देत होती. परंतु, उपचारादरम्यान तिला वाचविण्यात अपयश आले. यामुळे संतप्त नातेवाईक व गावकर्यांनी आज रास्ता रोको करीत, प्रशासन व ग्रामपंचायतबद्दलचा रोष व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व बुलढाणा पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गावात तणाव निर्माण झाला होता. या रास्ता रोकोमुळे बुलढाणा-अजिंठा मार्गावरील वाहतूक किमान चार तासापासून ठप्प झाली होती. अंजली भरत शेजोळ (८) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती धनगर वाडी परिसरातील जमीन पातळीवर असलेल्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेली असता, तोल जाऊन विहिरीत पडली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या अंजलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, संतप्त नातेवाईक व गावकर्यांनी रास्ता रोको करीत, अजिंठा राज्य मार्गावरील वाहतूक रोखली. या सर्वांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आंदोलकांशी चर्चा करीत होते.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे त्याच विहिरीत पडण्याची ही १०वी घटना आहे. या विहिरीत आतापर्यंत १० जण पडले आहेत. यातील ९ जणांना कायमचं अपंगत्व आलं आहे. दरम्यान, या पाणीटंचाईवर कायमची उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी बुलढाणा अजिंठा महामार्ग रोखून धरला. देऊळघाट येथे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. २५ हजार लोकसंख्या असलेल्या देऊळघाट येथील धनगरवाडी परिसरातील अंजली भरत शेजोळ ही मुलगी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. त्याच वेळी तिचा पाय घसरून ती ७० फुट खोल विहिरीत पडली. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.