मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील भानखेड गावाच्या सोहम विनोद सुरडकर याने १७ वर्ष वयोगटातील नेपाळ येथे झालेल्या १०० मीटर धावण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून भानखेड गावासह बुलढाणा जिल्ह्याचा मान उंचावला. त्याच्या या विजयाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सोहम सुरडकर हा गजानन उच्च माध्यमिक विद्यालय हसनाबादचा बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्याचा नॅशनल गेम ट्रायल २०२३ युथ गेम्स कौन्सिल ऑफ इंडिया १७ वर्षे वयोगटातून शेगाव येथे झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला होता. शेगावच्या क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याने त्याची राज्यस्तरावर निवड झाली होती. ग्वालियर (मध्यप्रदेश) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातून १०० मीटर धावणे ग्वालियर गोल्ड मेडलिस्ट राज्यस्तरीय स्पर्धेत सोहम विनोद सुरडकर याने प्रथम क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्यामधून प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे नेपाळ येथे इंटरनॅशनल स्पर्धेत त्याची निवड झाली होती.
दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी नेपाळ येथे झालेल्या १७ वयोगटातील आंतरराष्ट्रीय १०० मीटर धावण्यामध्ये सोहमने द्वितीय क्रमांक पटकावून भानखेड गावासह जिल्ह्याचा मान देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावला. त्याच्या या कामगिरीने त्याच्या आई-वडिलांसह कुटुंबातील सर्व व्यक्तींनी व गजानन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुगनचंद परदेशी, पर्यवेक्षक सरकटे सर भागवत सर, मेडल विभाग प्रमुख शंकर गोरे सर, क्रीडा शिक्षक इंगळे सर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याला शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले.