– तातडीने काम पूर्ण करण्याची परिसरातील ग्रामस्थांची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
चिखली (प्रतिनिधी) – तालुक्यातील मोहदरी ते तोरणवाडा या प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून कासवगतीने सुरु असून, या रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी मोहदरी – तोरणवाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे. रस्ता प्रचंड खराब असल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. रस्ता तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
चिखली तालुक्यातील मोहदरी ते तोरणवाडा प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता मागील दीड वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. अद्यापपर्यंत या रस्त्याचे काम अपूर्ण असून, रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. या रस्त्यावरून ये जा करणार्या वाहनधारकांनाही त्रास होत आहे. या मार्गाचे डांबरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून संथगतीने सुरू असून, काम सोडून ठेकेदार पळून गेलेला दिसतो. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तरी या मार्गाचे काम करणार्या कंत्राटदार कंपनीने अर्धवट काम करून गिट्टी मुरूम टाकून काम केलेले आहे. हे काम बर्याच दिवसापासून कासवगतीने सुरू असून, संबंधित गावाला जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्यामुळे मोहदरीवासीयांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. या गावांत जाण्यासाठी दिवसाकाठी दोन ते तीन बस असून, दैनंदिन मोटरसायकलने प्रवास करताना जीव मुठीत धरून कसा बसा प्रवास कारावा लागत आहे. तरी येथील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी मोहदरी व तोरणवाडा परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा, ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.
————