– शांतता समितीच्या बैठकीला वकिलांना डावलले – अॅड. राजेश दाभाडे
मेहकर (अनिल मंजुळकर) – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, रमजान- ईद हे सण आनंदात व मोठ्या उत्साहात साजरे करा. परंतु उत्सव साजरा करत असताना कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून पोलिसांना सहकार्य करा, कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. मिरवणुकीदरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात ध्वनीप्रक्षेपणाचा वापर करा. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवा. कुणाच्या भावना दुखतील, असे वर्तन करू नये. शांततेत व आनंदात उत्सव साजरे करावीत, असे आवाहन जानेफळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण मानकर यांनी केले. जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पत्रकार गजानन दुतोंडे, अमर राऊत, प्राध्यापक कृष्णा हावरे, गणेश सवडतकर, विष्णू वाकळे, अनिल मंजुळकर यांच्यासह शिवसेनेचे महादेव पाखरे, सामाजिक कार्यकर्ते शेख अजीज भाई यांच्यासह पोलिस बांधव व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी रायटर पोलीस कॉन्स्टेबल विनोद फुफाटे, गोपनीय पोलीस विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांनी परिश्रम घेतले.
तसेच, या बैठकीवरून काही वादही निर्माण झाला आहे. जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक खेडी असून, गावामध्ये शांतता सुव्यवस्था राहावी म्हणून शांतता समितीची बैठक घेतली जाते. आगामी रमजान, १४ एप्रिल भीम जयंती आणि महावीर जयंतीच्या अनुषंगाने गाव आणि परिसरामध्ये शांतता आबाधित राहावी म्हणून शांतता समितीचे बैठकीचे आयोजन केले होते. पण ही बैठक केवळ औपचारिक ठरल्याचे दिसून येत. केवळ मोजक्याच, मर्जीतील लोकांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले. वास्तविक सदर गाव आणि परिसरामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक राहत असताना प्रत्येक जाती धर्मातील प्रतिष्ठित व्यक्तींना तसेच वकील मंडळींना बोलवणे हे आवश्यक असतानादेखील केवळ मर्जीतील लोकांना बोलावून सदर बैठक पार पाडण्यात आल्याची टीका होत आहे. त्यातल्या त्यात जानेफळ येथील शांतता समितीमध्ये प्रशिक्षित वकील, विधीज्ञ त्या शांतता समितीचे सदस्य असणे हे मेन्डेटेरी असतानादेखील जानेफळतील शांतता समितीमध्ये विधिज्ञचा समावेश नाही. मर्जीतील जवळच्या दोन-चार लोकांना नेहमीच पोलीस स्टेशनमध्ये झुकते माप दिले जाते. यावेळेस गावामध्ये विधिज्ञ हजर असताना विधीज्ञांना न बोलवल्याने ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट राजेश दाभाडे यांनी संताप व्यक्त केला आहे, व या संदर्भात वरिष्ठ अधिकार्यांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
शांतता कमिटीची मिटिंग पोलीस स्टेशनमध्ये, आणि दुसरीकडे गावातच दारुचा सुळसुळाट. मिरवणूक काढतेवेळी रस्तात सर्व अडथळे, गावात लाईट बंद, जयंतीच्या दिवशी शासकीयदृष्ट्या दारुबंद आणि मिरवणुकीमधे दारु पिऊन धिंगाणा घालणारे दिसून येतात. ज्यांचा कवडीमोलाचाही संबंध नाही, त्यांची मीटिंग. म्हणजे हे असं झालं की गांव जळो हनुमान गावाच्या बाहेर?
– अॅड. बबनराव वानखेडे, जानेफळ
————-