– एप्रिल महिन्यातही शाळा सुरूच राहणार!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळांना २ मेपासून सुट्टी जाहीर झाली असून, ही सुट्टी ११ जूनपर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून सुरु होणार आहे. तर, विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता, २६ जूनपासून सुरु होणार आहे. या संदर्भात शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांना ३० एप्रिलरोजी किंवा त्यानंतर उन्हाळी सुट्टीच्या काळात जाहीर करता येणार आहे. हा निकाल संबंधित विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही शाळांची असेल. शाळातून उन्हाळी किंवा दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून नाताळ किंवा गणेशोत्सवदरम्यान समायोजन करण्याचे अधिकार शिक्षण अधिकार्यांच्या परवानगीने देण्यात येणार आहे. तसेच, शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या ७६ पेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता शिक्षण अधिकार्यांनी घ्यावी, असेसुद्धा परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षण संचलनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.
मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की पालकांना फिरण्याचे वेध लागतात. मात्र कोरोनामुळे अनेक कुटूंब घरातच अडकून पडली होती. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सरकारकडून अनेक निर्बंध हटवण्यात आले. अशावेळी यंद पालकांनी मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की फिरण्याचे बेत आखले होते. मात्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्यातही शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना बाहेर फिरण्याचा प्लॅन थोडा उशीराच करावा लागणार आहे.
——————-