– कार्यक्रमस्थळाची पोलिस अधीक्षकांकडून पाहणी
– महापूजन सोहळा व धार्मिक सभेसह भव्य आरोग्य महाशिबिराचे आयोजन
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस हे बुलढाणा जिल्ह्यात येत असून, गुरूवारी, ६ एप्रिलरोजी नांदुरा येथे आयोजित हनुमान जयंती उत्सव कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. यावेळी महापूजन सोहळा व धार्मिक सभेसह भव्य आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कार्यक्रम स्थळाची जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी ३ एप्रिलरोजी पाहणी केली.
श्री तिरूपती बालाजी संस्थान नांदुराच्यावतीने हनुमान जयंती उत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम ६ एप्रिलरोजी आयोजित करण्यात आले आहेत. नांदुरा येथे सदर संस्थानच्यावतीने १०५ फुट उंचीची महाकाय हनुमान मूर्ती उभारण्यात आलेली असून, त्याची लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड़मध्ये नोंदसुध्दा झालेली आहे. याच मूर्तीची मान्यवरांच्याहस्ते सकाळी महापूजा होणार असून, शक्ती ले आऊट येथे धार्मिक सभा होणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत महाआरोग्य शिबीर होणार असून, यामध्ये हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस आदींचे प्रत्यारोपणासह विविध २० गंभीर आजारांची तपासणी करण्यात येवून शस्त्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे. या कार्याक्रमाला मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस उपस्थित राहणार आहेत.
आचार्य जितेंद्र नाथ महाराज, महामंड़लेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज, प.पू.शंकरजी महाराज, कामगार आयुक्त श्रीकांत शिंदे आदिंची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम स्थळाची जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड़ यांनी तीन एप्रिलरोजी पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. सदर संस्थानच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, मोहनराव नारायणा नेत्रालयाच्या माध्यमातून अल्पदरात नेत्रतपासणीसह शस्त्रक्रियासुध्दा केल्या जातात. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.