BULDHANAHead linesVidharbha

पोलिसांच्या बाबतीत बुलढाण्यात घडलं वेगळं काही..! पोलिसांनीच गाजविला निवडणुकीचा फड!!

बुलढाणा (संजय निकाळजे) – ‘पोलीस’.. शासनाचा महत्त्वाचा घटक..! जेथे कोणी जाणार नाही तेथे पोलिसांना पाठवल्या जाते. चोरीची घटना, आत्महत्या, खून, अपघात, मोर्चा, आंदोलन, निवडणुकीमध्ये बंदोबस्त ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवल्या जाते. मात्र बुलढाणामध्ये पोलिसांच्या बाबतीत वेगळं काही घडलयं. पोलिसांनीच निवडणुकीचा फड गाजविला. पोलीस पतसंस्था निवडणुकीच्या निमित्ताने..! गेल्या काही दिवसापासून पोलीस वर्तुळात निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला होता. निमित्त होते पोलीस पतसंस्था निवडणुकीचे. या निवडणुकीत केशव नागरे यांच्या प्रगती पॅनलने बाजी मारली असून एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे.

बुलढाणा येथे पोलीस कर्मचार्‍यांची भली मोठी धनिक पतसंस्था आहे. २०१५ मध्ये तीन कोटीच्या आसपास भाग भांडवल असणारी ही संस्था सध्या धनवान झाली आहे. २०१५ पासून पोलीस कर्मचारी केशवराव नागरे यांनी संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली. जिजाऊ कन्यारत्न योजनेसारखी अभिनव उपक्रम राबवून संस्थेला पारदर्शी व शिखरावर नेले. त्यांच्या संचालक मंडळाचा कालावधी संपल्याने १ एप्रिल २०२३ रोजी निवडणुका पार पडल्या. यामध्ये जिल्ह्यातील सतराशे पोलीस कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. निवडणुकांसाठी प्रत्येक तहसीलवर बूथची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण १३ तहसील वर १३ बूथ राहिले. प्रगती पॅनल, विकास पॅनल, सत्तेवादी व अपक्ष असे चार पॅनल मिळून एकूण ३६ उमेदवार उभे होते. यामध्ये प्रगती पॅनलने बाजी मारली. त्याची मतमोजणी रविवार, २ एप्रिल २०२३ रोजी पोलीस मुख्यालयात पार पडली. त्यामुळे पोलीस मुख्यालय गाजबजून गेले होते. डीडीआर कार्यालय निरीक्षक खंडारे यांनी निवडणुकीचे काम पाहिले. या निवडणुकीत नंदू आंधळे, अमोल हिवाळे, वनिता शिंगणे, रुबीना शेख, विकास खांजोडे विजय झाले.

पोलीस पतसंस्था भरभराटीत नेण्यामध्ये केशव नागरे यांचा वाटा मोठा आहे. त्यांनी केलेल्या निरपेक्ष व पारदर्शक कामामुळे पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना प्रथम पसंती दर्शवली. आज त्यांच्याच नेतृत्वात प्रगती पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांपासून तर लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतो. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे नेते कार्यकर्ते गुलालाने रंगलेले असतात. तर त्यापासून पोलीस कर्मचारी अलिप्त असतात. मात्र पोलिस पतसंस्था निवडणुकीच्या निमित्ताने पोलीस कर्मचारी गुलालाने रंगलेले दिसल्याचे चित्र पहावयास मिळाले.

—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!