बुलढाणा (बाळू वानखेडे) – ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने व्यक्त केलेली शक्यता तंतोतंत खरी ठरली असून, बाजार समिती निवड़णुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज, ३ एप्रिलरोजी मेहकर बाजार समितीसाठी तब्बल १२७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आता एकूण १६१ इच्छुक उमेदवार झाले आहेत. चिखली व लोणारमध्ये तर अक्षरशः उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड़ उडाली होती. त्यामुळे कर्मचार्यांचीही दमछाक झाली. दाखल उमेदवारी अर्जांची छाननी ५ एप्रिलला होणार असून, २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.
जिल्ह्यातील मेहकर, बुलढाणा, चिखली, लोणार, खामगाव, देऊळगावराजा, नांदुरा, जळगाव जामोद, शेगाव व मलकापूर आदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवड़णुका घोषित झाल्या असून, २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु मध्यंतरी तीन दिवस सुटी आल्याने आज, ३ एप्रिलरोजी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी झाली. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज १२७ इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली असून, एकूण १६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. चिखली व लोणारमध्ये तर इच्छुकांनी एकच झुंबड़ केली.
यामध्ये चिखली बाजार समितीसाठी एकूण २४२ तर लोणार बाजार समितीसाठी २३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुलढाणा बाजार समितीसाठी एकूण १८५ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर जिल्ह्यात पहिल्या व विदर्भात क्रमाक दोनवर असलेल्या खामगाव बाजार समितीसाठी आज १६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तसेच मलकापूर बाजार समितीसाठीसुध्दा एकूण १६८ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. इतर बाजार समित्यांसाठीही इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरल्याची माहिती आहे. सर्वच ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणारांनी गर्दी केल्याने कर्मचार्यांचीही दमछाक झाली.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवड़णुका ह्या विधानसभेची रंगीत तालीम असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सदर निवड़णूक प्रतिष्ठेची केली असून, बरेच ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी तिहेरी लढतीची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान,५ एप्रिलरोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. एकंदरित वीड्रॉलनंतरच चित्र स्पष्ट होणार असले तरी प्रचाराला दिवस कमी मिळणार असल्याने भाऊ, ताईंकडून आपल्या उमेदवारीला हिरवी झेंड़ी मिळेलच, अशा ठाम विश्वासावर काहींनी भेटीगाठी सुरू केल्याचे दिसते.