बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरूच असून, उरल्यासुरल्या शेतीपिकांचीही नासाडी सुरूच आहे. जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कांदा, टोळकांदासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यात चारवेळा अवकाळी पाऊस पड़ला. गेल्या १७ ते २० मार्चदरम्यान तर जिल्ह्यात सर्वदूर वादळ, गारासंह जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे रब्बीसह कांदालिंबू, टरबूजसह इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले असून, बहुतांश गावांचा सर्व्हेसुद्धा झाला पण अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. आज, ३१ मार्चरोजी जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम परिसर, देऊळगाव साकरशा शिवार, चिखली तालुक्यातील आमखेड़ शिवार, कोलारा, हातणी तसेच चिखली परिसरातही अवकाळी पाऊस पड़ला. खामगाव तालुक्यात शहापूर, वहाळा व इतरही भागात पाऊस झाला. काही भागात तर वादळी वार्यासह पाऊस झाला. यामुळे कांदा, आंबा, वीटभट्ट्यांचेही नुकसान झाले. यावर्षी पाऊस शेतकर्यांचा पिच्छा सोड़ायला तयार नाही. संकटावर संकटे येत असल्याने शेतकरी पूर्णतः खचला असताना शासन मात्र तोंडावरून हात फिरविण्याचे काम करत असल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहे.