AURANGABADBreaking newsHead linesMarathwada

‘बीडीओं’नी लाच मागितली; सरपंचाने पैसे उधळले!; फुलंब्री पंचायत समिती आवारातील धक्कादायक प्रकार!

UPDATE

साबळेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
घडलेल्या या प्रकाराने नागरिक आवाक झाले. उडवलेले पैसे बराचवेळ तेथेच पडून होते. नंतर तेथे उपस्थित नागरिकांनी पैसे जमा केले. घडलेला सर्व प्रकार अधिकारी, कर्मचारी हे खिडकीतून पाहात होते. घटना घडल्यानंतर गटविकास अधिकारी व पंचायत समिती येथील सर्व कर्मचारी हे फुलंब्री पोलिस ठाण्यात जाऊन मंगेश साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.
————
बीडीओंना तात्पुरते निलंबन
‘मी २० वर्षे झाले आमदार आहे, मी २० वर्षे विरोधातही होतो. त्यावेळी आणि आताही मी राज्यभरात पाहतोय की अनेक ठिकाणच्या मागणीच्या गोष्टी पुढे येत आहेत. पैसे मागितले जात आहेत. जास्त लोकांची मागणी आल्यावर तुझा नंबर आधी लावतो, याचा नंबर लावतो या गोष्टी होत आहेत. त्यामुळे या संदर्भात आम्ही अतिशय कठोर पाऊल उचलणार आहोत. जे निदर्शनास येईल त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रथमदर्शनी बीडीओंना निलंबित केलं आहे. या संदर्भात चौकशी लावलेली आहे’, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.


– घटनेची छत्रपती संभाजीनगर ‘झेडपी’च्या सीईओंकडून तत्काळ दखल, चौकशीचे आदेश, उद्यापर्यंत कारवाई करणार
– सरपंचाचा लाचखोरीच्या निषेधार्थ पैसे उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच राज्यभर खळबळ

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी फुलंब्री पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (बीडीओ)ने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होत असून, त्यामुळे शेतकर्‍यांनी व्याजाने पैसे काढून ते पैसे बीडीओला देण्यासाठी आणले. परंतु, ऐनवेळी बीडीओंनी चार लाखाची लाच मागितली. त्यामुळे संतप्त झालेल्या गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे यांनी शेतकर्‍यांनी सोबत आणलेले पैसे फुलंब्री बीडीओच्या कार्यालयासमोर उधळून अनोखे आंदोलन केले. दरम्यान, या लाचखोरीप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. तत्काळ समिती स्थापन करून, उद्यापर्यंत चौकशी अहवाल मागविला आहे. सरपंचाच्या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल होताच राज्याच एकच खळबळ उडाली आहे.

भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री पंचायतीत घडली. शेतकर्‍यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करत उद्विग्न झालेल्या सरपंचाने थेट दोन लाख रुपयांच्या नोटाच पंचायत समिती आवारात उधळल्या. गेवराई पायगा या गावाचे सरपंच मंगेश साबळे यांनी पंचायत समितीचे बीडीओ लाच मागत असल्याने गावकर्‍यांकडून २ लाख रुपये जमा केले. मात्र बीडीओंना चार लाख रूपयेच लाच हवी, असे अधिकार्‍यांनी सांगितल्याचा दावा साबळेंनी केला. एवढे पैसे देणे शक्य नसल्याने अखेर उद्विग्न होऊन सरपंच साबळेंनी जमा केलेले २ लाख रूपये थेट पंचायत समितीच्या प्रांगणात उधळले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे सरकारी कार्यालयांना लागलेली भ्रष्टाचाराची कीड पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.


दरम्यान, फुलंब्री पंचायत समितीतील लाचखोरी प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी तत्काळ एक समिती स्थापन करून उद्यापर्यंत चौकशी अहवाल मागवण्यात येईल, असे मीणा स्पष्ट केले.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!