बुलढाणा (संजय निकाळजे) – सोमवार तसा चिखली येथील बाजाराचा दिवस.. आणि याच बाजाराला चिखली तालुक्यातून गोरगरीब जनता येत असते. केंद्रातील- राज्य सरकारने महागाई केली, असा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. आणि, याच मुद्द्याला धरून आणि शेतकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार २७ मार्च रोजी कृषी कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनातील एक ऑटो ज्या ऑटोला महागाईच्या संदर्भात लावलेले पोस्टर आणि त्यावर तयार केलेली झोपडी बघणार्यांचे केंद्रबिंदू ठरले. काँग्रेस अन् महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचे झेंडे, सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी, बैलगाड्यांच्या देखाव्यातील आकर्षण बघण्यासारखे होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखलीच्या कृषी अधिकारी कार्यालयावर निघालेल्या घेराव मोर्चा चिखली तालुक्यातील हजारो शेतकरी आणि महिला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात या घेराव आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. बोंद्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळून निघालेला घेराव मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, बसस्टँड, डॉ. गुप्ता हॉस्पिटल या मार्गे तहसील कार्यालयाजवळून तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडकला. चिखलीचे तापलेले राजकीय वातावरण पाहता जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, दंगाकाबू पथक, अतिरिक्त पोलिस कुमक चिखलीत तैनात करण्यात आल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात मोर्चात सहभागी शेतकर्यांना, महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांना संबोधित केले. यावेळी राहुल बोंद्रे राज्य आणि केंद्र सरकारवरच चांगलेच बरसले. हे जुमल्यावाल्यांचे सरकार आहे, खोक्यावाल्यांचे सरकार आहे. शेतकरी मेला तरी त्यांना काही फरक पडत नाही. देशात लोकशाही फक्त कागदावर आहे, प्रत्यक्षात नरेंद्रभाई आणि अमितभाईंची हुकूमशाही सुरू आहे. इडी, सीबीआयचा गैरवापर दाखवून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे लोन आता दिल्लीतून गल्लीत आले. माझ्यावरही दरोड्याचे गुन्हे दाखल केले. पण लक्षात ठेवा, मी जेलची हवा खाऊन आलोय.. त्यामुळे तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा, शेतकर्यांसाठी मी लढतच राहणार असा घणाघात राहुल बोंद्रेंनी यावेळी केला.
घेराव मोर्चात विधान परिषद आमदार धीरज लिंगाडे, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज दांडगे, ज्योतीताई खेडेकर, कुणाल बोंद्रे, शिवसेनेचे तालुका प्रमुख किसन धोंडगे, सचिन बोंद्रे, बाळू साळोख, सोळंकी, सत्येंद्र भुसारी अशोकराव पडघान यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनातील महत्त्वाचे आकर्षण ठरले ते ऑटोवर तयार केलेली झोपडी व त्यावर लावलेले महागाई संदर्भातील विविध पोस्टर्स. ज्यामध्ये शेतकर्यांचा पीकविमा, गॅस सिलिंडरचे गगनाला भिडलेले भाव, एसटीमध्ये महिलांना दिलेले अर्धी तिकीट हे विषय महत्त्वाचे ठरले. त्यातील महिलांना अर्धे तिकीट दिल्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये गॅस सिलिंडर द्यावे, ही मागणी महिलावर्गाचे लक्ष वेधून घेत होती.
——————