Head linesKARAJATPachhim Maharashtra

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत आ. पवार, आ. शिंदेंचा लागणार कस!

कर्जत (आशीष बोरा) – गेली अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा बिगुल वाजला असून, न्यायालयाने एप्रिल अखेरपर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्याने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी २ हजार ५७७ मतदारांची मतदार यादी तयार करण्यात आली असून, ती जाहीर करण्यात आली असल्याची माहिती प्रशासक साहेबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, या बाजार समिती निवडणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्या राजकीय नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे.

कर्जतमध्ये तालुक्यातील राजकीय परिस्थितीत सद्या काटे की टक्कर पहावयास मिळत असून, सद्या आरोप प्रत्यारोपांची जी राळ उठली जात आहे, यामध्ये या निवडणुकीतून राष्ट्रवादीसह भाजपाचा कस लागणार आहे. आ. रोहित पवार व आ. प्रा. राम शिंदे या पैकी कोणाची ताकद जमिनीवर वाढली आहे की कमी झाली आहे, हे थेटपणे तपासले जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून ग्रामपंचायती, सोसायटी, व्यापारी मतदारांची चाचपणी करून उमेदवार निश्चित करणे, पॅनल तयार करणे साठी धावपळ सुरू झाली आहे. बाजार समिती ही तालुक्याची महत्वाची संस्था समजली जाते, या संस्थेवर आपले व आपल्या पक्षाचे वर्चस्व रहावे यासाठी राजकीय पक्ष विशेष ताकद लावणार असून, कर्जतमध्ये भाजपचे आ. प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार यांचे या निवडणुकीकडे विशेष लक्ष राहणार आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये यानिमित्त संघर्ष पहावयास मिळणार आहे.

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी तालुक्यातील ७६ सहकारी संस्थांमधील ९७० सदस्यातून बाजार समितीसाठी ११ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. तर ९१ ग्रामपंचायतींच्या ८४५ सदस्यांमधून ४ सदस्य निवडले जाणार आहेत. ४८९ व्यापारी वर्गातून दोन संचालक तर हमाल मापाडी वर्गाच्या २९२ सभासदांमधून एका सदस्याची निवड करून बाजार समितीसाठी एकूण १८ संचालक निवडले जाणार आहेत. एकूण मतदार संख्या २५७७ असल्याची माहिती कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश कदम यांनी दिली. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सुखदेव सूर्यवंशी हे काम पाहणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार बाजार समिती निवडणुकीसाठी दि.२७ मार्च ते ३ एप्रिलपर्यत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दि. ५ एप्रिलला आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. दि. ६ रोजी वैध अर्ज प्रसिद्ध करण्यात येतील. दि. ६ ते २० दरम्यान उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत असून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी २१ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी २९ एप्रिल रोजी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!