सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल आणणार्या शेतकर्यांना माफक पैशांमध्ये म्हणजेच एक रुपयांमध्ये भरपेट जेवणाची योजना सुरू करण्यात आली होती. परंतु ही योजना बंद झाल्याने शेतकर्यांची उपासमार सुरू झाली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आ. विजयकुमार देशमुख यांनी शेतकर्यासाठी एक रुपयामध्ये भरपेट जेवणाची बंद पडलेली योजना पुढाकार घेऊन ही योजना सुरू केली होती. त्यामुळे बाजार समितीमध्ये येणारे शेतकर्यांना भरपेट जेवण मिळत होते. परंतु या योजनेला घरघर लागल्याने येथील चालक आर्थिक डबघाईत गेल्याने तो वर येऊ शकला नाही. त्यामुळे येथील चालक सोडून गेल्याने आता एक रुपयाची जेवणाची योजना बंद झाली आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये येणारे शेतकर्यांना आता पदरमोड पैसे खर्च करून हॉटेलमध्ये नाश्ता, जेवण करावे लागत आहे. त्यासाठी शेतकर्यांचे शे पाचशे रुपये अनामत खर्च होत आहेत.
तसे पाहता एक रुपयाची जेवणाची योजना सुरू असल्याने अनेक शेतकर्यांना एक रुपयांमध्ये भरपेट जेवण मिळत होते. त्यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात होते. या योजनेचा लांबून शेतमाल आणणार्या शेतकर्यांना खूपच फायदा होत होता. दरम्यान, सोलापूर बाजार समितीमधील एक रुपयाची जेवणाची योजना नेमके कोणत्या कारणामुळे बंद झाली. याबाबत माहिती विचारण्यासाठी उपसभापती श्रीशैल नरोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.