– काँग्रेसच्या गोटात घडामोडींना वेग; राजकीय, कायदेशीर लढाई लढणार!
– मी भारताचा आवाज बनून लढत आहे, कोणतीही किंमत चुकविण्यास तयार – राहुल गांधी
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने एका नोटिफिकेशनद्वारे रद्द केली आहे. राहुल गांधी यांनी पळून गेलेल्या सर्व चोरांचे नाव मोदीच कसे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मानहानीच्या एका खटल्यात सुरत येथील न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती. न्यायालयाच्या या निकालानंतर लोकसभा सचिवालयाने आज एक नोटिफिकेशन जारी करत, संविधानाच्या कलम १०२ (१) आणि लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१च्या कलम ८ अनुसार राहुल गांधी यांना अयोग्य घोषित केले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची वायनाड लोकसभा मतदारसंघातील सदस्यता रद्द झाली असून, आजपासून (दि.२३) हा आदेश लागू झाला असल्याचेही या नोटिफिकेशनमध्ये नमूद आहे. दरम्यान, खासदारकी रद्दचा निर्णय लोकसभा सचिवालयाने दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसची पुढील रणनीती निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयावर सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र डागत, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान, आपली खासदारकी वाचविण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असून, कायदेशीर व राजकीय लढाई लढू, असा इशारा काँग्रेसने दिलेला आहे. आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असून, मोदी सरकारच्या या सुनियोजीत षडयंत्राविरोधात आम्ही कायदेशीर व राजकीय अशी दोन्ही लढाई लढू, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी सांगितले. तर आपण भारताच्या आवाजासाठी लढत असून, देशासाठी कोणतीही किंमत आपण चुकवू, असे राहुल गांधी यांनी नी़क्षून सांगत, देशातील हुकुमशाहीविरोधात आपली लढाई चालूच राहील, असेही गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईच्या विरोधात महाराष्ट्राच्या राजकारणातही तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांची आंदोलने सुरु झाली असून, सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राहुल गांधी आणि फैजल यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरवणे हे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. लोकशाही मूल्यांना छेद दिला जात आहे. हे निषेधार्ह आणि संविधान ज्या तत्त्वांवर आधारित आहे त्याच्या हे सर्व विरोधात आहे. आपल्या लोकशाही संस्थांचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र उभे राहण्याची गरज असल्याचे म्हणत शरद पवार यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
———————