– जळगाव जिल्ह्यातून येणारा अवैध गुटखा पकडला!
बुलढाणा/सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी परिसरामध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत व त्यांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी करत, जळगाव जिल्ह्यातून आलेला अवैध गुटखा जप्त केला. या कारवाईत प्रतिबंधीत गुटख्यासह सुमारे पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एकीकडे गुढीपाडवा सण उत्साहात साजरा होत असताना पोलीस बांधव मात्र सणाच्या दिवशीही आपली कामगिरी चोख बजावत होते. आज दि.२२ रोजी मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर येथे नाकाबंदीदरम्यान व मिळालेल्या गुप्त माहितीवरुन एक संशयित वाहन मारुती इको क्रमांक एमएच १९ सीझेड ७२४३ यास नाकाबंदीवरील कर्मचारी पोलिस शिपाई काकड व इतर यांनी गाडी थांबवून गाडीची पाहणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला, असा माल आढळून आला. याबाबतची माहिती पोलिस कर्मचारी यांनी मलकापूर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजपूत यांना दिली. त्यानंतर ठाणेदार राजपूत यांनी ताबडतोब दसरखेड टोल नाकास्थळी जाऊन वाहनाची पाहणी केली. सदर वाहनात प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला हा आढळून आला. वाहनाच्या चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गजानन पुंडलिक राऊत, वय ३८ राहणार तोरणाळा तालुका जामनेर जिल्हा जळगाव असे सांगितले. याबाबत कायदेशीर कार्यवाही करून पोलीस स्टेशनला अप नं. ३५/२०२३ कलम ३२८, १८८, २७२, २७३ भादंविसह २६(२)(आय ) २६ २ आय व्ही, २७ ३ (ई) अन्नसुरक्षा मानके कायदा इ २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या कार्यवाहीमध्ये खालील प्रमाणे माल मिळून आला – १)गुटखा राजनिवास, २) राज निवास प्रीमियम, ३) वाह पान मसाला, ४) चीन टोबॅको मिक्स व ५) वाहन, असा एकूण ४ लाख ६४ हजार ८७५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक खामगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दुर्गेश राजपूत, पोहेका इंगळे, काळे, नापोका बावणे, सुरडकर, सावे, पो.कॉ. काकड यांनी केली. जवळच्या जळगाव जिल्ह्यामधून गुटखा मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
—————–