BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

मेहकर आगाराचे ११ चालक व वाहक तडकाफडकी निलंबीत!

– पाहणी पथकाच्या अचानक भेटीत उघड झाला धक्कादायक प्रकार!

सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – मुक्कामी असलेल्या बसेस वार्‍यावर सोडून आपल्या नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला जाणे मेहकर आगारातील ११ वाहक व चालक यांना चांगलेच अंगलट आले आहे. मेहकर डेपोच्या आगार व्यवस्थापकांमधील पाहणी पथकाने सिंदखेडराजा येथे मुक्कामी असलेल्या या बसेसची अचानक रात्रीच्यावेळी तपासणी केली असता, हे चालक व वाहक आढळून आले नाहीत. त्यामुळे या सर्व चालक व वाहकांना एसटी महामंडळाने तडकाफडकी निलंबीत केले आहे. या कारवाईने एसटी महामंडळाच्या चालक व वाहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे, की दिनांक १५ मार्चरोजी सिंदखेडराजा आगारामध्ये मेहकर येथील पाच ते सहा एसटी बसेस मुक्कामी होत्या. एसटी ड्रायव्हर व कंडक्टर पेक्षाही ड्रायव्हर (चालक)ची जबाबदारी असते की एसटी बसेस ज्या ठिकाणी मुक्कामी आहे, त्या ठिकाणी त्यांना एसटी बसेस सोडून कुठेही जाता येत नसते. त्यांना मुक्कामी भत्तासुद्धा महामंडळ देत असते. परंतु, १५ मार्चरोजी मेहकर आगारातील चार ते पाच बसेस या सिंदखेडराजा आगारात मुक्कामी असताना सिंदखेडराजा येथे बसेस तशाच सोडून ड्रायव्हर व कंडक्टर हे आगारामध्ये असलेल्या विश्रांती कक्षात न थांबता, परस्पर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी निघून गेले. परंतु १५ मार्चच्या रात्री मेहकर येथील आगार व्यवस्थापकांमधील पाहणी पथकाने सिंदखेडराजा येथे मुक्कामी बसेस असणार्‍या ड्रायव्हर व कंडक्टरची तपासणी केली असता, रात्रीच्या वेळेला अकरा वाजेनंतर त्यांना मुक्कामी बसेसमध्ये कुठल्याही प्रकारचे वाहन चालक आढळून आले नाही. त्याचा अहवाल स्थानिक तपास अधिकारी यांनी मेहकर आगार व्यवस्थापकांना बुलढाणा विभागीय वाहतूक अधिकारी यांना सादर केला. हा अहवाल व घटनेची गांभीर्यता पाहाता, बुलढाणा वाहतूक निरीक्षक यांनी दि. २१ मार्चरोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सेवा विनियमापैकी विनियम क्रमांक ८३मध्ये तरतूद केल्याप्रमाणे ११ वाहन चालक व वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
या निलंबीत वाहक व चालकांमध्ये – आर. डी. मुंढे (चालक), आर. डी . भालेराव, अनंता मुंढे (चालक), डी.एन.घुगे (चालक), व्ही.बी. वाघमारे (चालक), लता चौधरी (वाहक), एस.ए. गिते (वाहक), के.एस. घुगे (वाहक), रिता राठोड (वाहक), रमा चव्हाण (वाहक) यांचा समावेश आहे.


मुक्कामाच्या ठिकाणी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर!

याबाबत एसटी कष्टकरी संघाने आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिले असून, आगारामार्फत चालवण्यात येणार्‍या कामगिरीच्या ठिकाणी वाहक व चालकांसाठी कुठल्याही प्रकारची शौचालय व पिण्याचे पाण्याचे सुविधा नसल्यामुळे वाहन व चालकांचे हाल होत आहेत. त्या ठिकाणी वाहन चालकांसाठी उपलब्ध सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी एसटी कष्टकरी जनसंघाने आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!