माजी आ. राहुल बोंद्रेंविरूद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याने चिखलीत संतापाची लाट!
– राजकीय दबावापोटी चिखली पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप
चिखली/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लाखो अंध-अपंग, निराधार रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरे घेणारे, गोरगरिबांना चालताबोलता हजारो-लाखो रुपयांची मदत देणारे, घरचे गडगंड श्रीमंत असलेले व सुसंस्कृत राजकारण करणारे माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यावर रॉबरी- दरोड्यासारखा गुन्हा दाखल झाल्याने चिखली तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. राहुल बोंद्रे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांवर राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत, महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी रविवारी (दि.१९) जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांची भेट घेऊन, चिखली पोलिसांविरुद्ध निवेदन सादर करणार आहेत. तसेच, हे खोटे गुन्हे तातडीने खारीज करण्याची मागणी केली जाणार आहे. दरम्यान, या गुन्ह्यात राहुल बोंद्रे यांना पाच दिवसांचा सशर्त जामीन मंजूर झाला असल्याचे पोलिस सूत्राने सांगितले आहे.
माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे वडील कर्मयोगी स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याचा आरोप करत आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार भाजपचे कार्यकर्ते श्याम वाकदकर यांनी चिखली पोलिसांत दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी माजी आमदार राहुल बोंद्रे, त्यांचे स्वीय सहाय्यक श्लोकानंद डांगे, विजय गाड़ेकर, अतरोद्दीन काझी यांच्यासह इतरांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये मारहाणीसह दरोड्याचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. तसेच चिखलीच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांचे स्वीय सहाय्यक चंद्रकांत काटकर यांनी राहुल बोंद्रे यांनी बदनामी केल्याची व धमकी दिल्याची तक्रार बुलढाणा पोलिसांत दिली असून, याप्रकरणीदेखील राहुल बोंद्रे यांच्या विरोधात बुलढ़ाणा पोलिसांतही गुन्हे दाखल झाले आहेत. सदर गुन्हे चुकीच्या पध्दतीने व राजकीय दबावापोटी दाखल केले असून, हे गुन्हे खारीज करावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते रविवारी, १९ मार्चरोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड़ यांची भेट घेवून तसे निवेदन देणार आहेत. तरी जिल्ह्यातील आजी, माजी काँग्रेस पदाधिकार्यांनी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय गांधी भवन येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. इसरार यांनी केले आहे. याबाबत महाविकास आघाड़ीतील घटक पक्षांच्या नेत्यांसोबत संपर्क झाल्याचेही त्यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला सांगितले.
राहुल बोंद्रे यांचे वडिल कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांचे नुकतेच निधन झालेले आहे. तात्यासाहेब हे चिखली तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जातात. चिखली पोलिसांनी वाकदकर यांच्या तक्रारीवरून जे गुन्हे दाखल केलेत, ते अजामीनपात्र स्वरुपाचे होते. हे गुन्हे दाखल करून ऐन दुःखाच्या प्रसंगात चिखली पोलिसांना राहुल बोंद्रे यांना कोठडीत डांबायचे होते का? असा संतप्त सवालही राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. याप्रश्नी महाविकास आघाडीचे आमदार विधानसभेतदेखील आवाज उठविण्याची शक्यता आहे. चिखली पाेलिसांनी बोंद्रे यांच्यासह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांवर कलम 395, 397, 504, 506 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
——————