बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शासनाने कितीही दबाव आणला तरी जुन्या पेन्शन योजनेसाठी आवळलेली एकीची वङ्कामूठ आज १८ मार्च रोजी देखील घट्ट आहे. दरम्यान, राज्य समन्वय समितीने पुढील टप्प्यातील विविध आंदोलनाची रूपरेषा ठरविली असून, सोमवारी थाळीनाद आंदोलनाचा आवाज गुंजणार असल्याचे राज्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी जाहीर केले आहे.
नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी, विविध विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांनी १४ मार्चपासून संपाची हाक दिली होती. या संपात महसूल कर्मचारी संघटना, जि.प. संघटना, शिक्षक संघटना, अपंग कर्मचारी संघटना कास्ट्राईब संघटना, कृषी कर्मचारी संघटना, उपविभागीय महसूल संघटना, पाटबंधारे व सिंचन संघटना यासह इतर संघटनांच्या महिला कर्मचारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपावर कुठलाही तोडगा न निघाल्याने पाचव्या दिवशीही संप सुरूच आहे. गेल्या चार दिवसात विविध आंदोलने करण्यात आली.
दरम्यान, पुढील आंदोलनाची दिशा राज्य समन्वय समितीने ठरविली आहे. २० मार्चरोजी राज्यातील कार्यालय व विद्यालयांसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. एकाचवेळी दुपारी हे आंदोलन होइल. २३ मार्चला ‘काळा दिवस’ पाळण्यात येणार आहे. यादिवशी सर्व कर्मचारी हाती काळे झेंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयांवर आक्रोश मोर्चा काढणार आहे. २४ मार्चला ‘माझे कुटुंब माझी पेंशन’ अभियान राबविण्यात येणार आहे. संपकरी कर्मचारी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध करणार आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने शासकीय कामकाज ठप्प पडलेले आहे.
——————-