बुलढाणा (खास प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी कर्मचार्यांची जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात समर्थन जाहीर केले आहे. राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांनी जुन्या पेन्शनसाठी संप पुकारला असून, या संपाला बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दिल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रातून म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी जुनी पेन्शन योजना कार्यान्वित करण्यासाठी खुले समर्थन जाहीर केले आहे. काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगड व इतर राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांना शिंदे – फडणवीस शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन लागू करून सर्वच कर्मचा-यांच्या वृध्दपकाळातील आधार हिरावून घेतला आहे. यापूर्वीदेखील जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी वेगवेगळ्या संघटनेंकडून अनेक आंदोलने, मोर्चे तसेच शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. परंतु दुर्दैवाने त्यातुन काही निष्पन्न झाले नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्तेत असलेल्या चार राज्यात काँग्रेस पक्षाच्या सरकारने जुनी पेन्शन योजना देण्याची घोषणा केली व लागूसुध्दा केली आहे. या तुलनेत आर्थिक सक्षम असणार्या महाराष्ट्र राज्यात राज्य शासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन का लागू करता येत नाही? असा प्रश्न एका प्रसिद्धी पत्रकातून काँग्रेसने उपस्थित केला आहे.
राज्यातील विविध संघटनांनी १४ मार्चपासून राज्यव्यापी संप पुकारला असून, या संपाला बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचा सक्रीय पाठिंबा आहे. शिवाय, काँग्रेस पक्षाच्या विविध शासकीय व निमशासकीय संघटनासुध्दा या संपामध्ये सहभागी होत आहेत. पेन्शन हा कर्मचा-यांचा हक्क आहे, आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. त्यामुळे या संपाकडे शासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही, याची त्वरीत दखल घेऊन कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सदबुद्धी शिंदे – फडणवीस सरकार सरकारला मिळो, असेही या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.