BULDHANAHead linesVidharbha

बाजार समित्यांत मोठी आवक; नाफेडचा पहिलाच दिवस कोरडा!

– आतापर्यंत केवळ २३ हजार शेतकर्‍यांची हरभरा विक्रीसाठी नोंदणी, मुदत वाढविली

बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य सरकारने नाफेड़मार्फत हरभरा खरेदी करण्याचे ठरविल्यानंतर २ मार्चपासून हरभरा उत्पादक शेतकर्‍यांची नोदणी सुरू केली तर आतापर्यंत केवळ २३ हजार शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून, १४ मार्चरोजी खरेदीच्या पहिल्याच दिवशी हरभर्‍याचा दाणाही खरेदी झाला नसल्याची माहिती आहे. शासनाने उशीरा सुरू केलेली नोंदणी व खरेदीची अनिश्चितता यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या १५ दिवसांत मात्र हजारो क्विंटल हरभरा विकला गेला असून, याचा फटका मात्र शेतकर्‍यांना बसला आहे. नावनोंदणीची मुदत आता ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.

यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीपाचे पीक हातातून गेले. थोड़ेफार आले त्यात खर्चही वसूल झाला नाही तर शासनाने देऊ केलेली अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत अद्याप जिल्ह्यात सर्वदूर मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. पाऊस भरपूर झाल्याने धरणे, विहिरी तुडूंब भरल्या व पाण्याची पातळी वाढली. हरभरा पिकास इतर पिकांच्या तुलनेत पाणी कमी द्यावे लागते, तुलनेत खर्चही कमी व बाजारपेठेच्या तुलनेत नाफेड़चे ५३३५ रुपये क्विंटल अर्थात भावही जास्त आहेत. या आशेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बीत हरभरा पेरा करण्यात आला. नाफेड़ने २ मार्चपासून हरभरा उत्पादक शेतकर्‍यांची नोंदणी सुरू केली असून, प्रती हेक्टर १२ क्विंटल ४ किलो याप्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील स्वराज्य शक्ती पुष्पक संस्था चिखली १०४७, कि.जट्टू बिबी प्रोड्यूसर कंपनी २१६०, कृउबास शेगाव केंद्र माटरगाव २७०, तालुका खरेदी विक्री संस्था बुलढ़ाणा ६७२, कृउबास संग्रामपूर केंद्र वरवट बकाल ९५३, खरेदी विक्री संघ लोणार २३३३, खरेदी विक्री संघ मेहकर ३०२८, संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा २०५८, खरेदी विक्री संस्था संग्रामपूर ७९३, खरेदी विक्री संस्था शेगाव २७२४, सोनपाऊली अ‍ॅग्रो प्रोड़युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्ड़ा १९०१, मॉ जिजाऊ शेतकरी उत्पादक कंपनी नारायणखेड़ केंद्र सिंदखेड़राजा १११९ व खरेदी विक्री संस्था खामगाव येथे ४२०० अशा एकूण २३,२५८ शेतकर्‍यांनी हरभरा विक्रीसाठी नावनोंदणी केली. हरभरा पीक निघून जवळजवळ १५ दिवस झाले. उशीरा सुरू केलेली नावनोंदणी, खरेदीची अनिश्चितता, हेक्टरी क्विंटलची कमी मर्यादा, त्यातच कर्जदारांचा तगादा व इतर देणी असल्याने शेतकर्‍यांना नाईलाजाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला हरभरा चार ते साड़ेचार हजार एवढ्या कमी भावाने विकावा लागला. गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील कृऊबासमध्ये हजारो क्विंटल हरभरा विक्री करण्यात आला. उदाहरणच द्यायचे तर एकट्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या चौदा दिवसात तब्बल ५१ हजार क्विंटल हरभरा आवक झाल्याची माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या हाती आली आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आज १४ मार्च पासून जिल्ह्यातील विविध केंद्रांवर नाफेडने मान्यवरांच्याहस्ते हरभरा खरेदीचा शुभारंभ केला. पण पहिला दिवस असल्याने आवक नसल्याचे सांगण्यात आले. काहीही असो पण याचा फटका मात्र शेतकर्‍यांनाच बसला आहे.


शासनाने नाफेड़च्या हरभरा खरेदीसाठी नांवनोंदणीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली असून, जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी नांवे नोंदवावी.
– एम. जी. काकड़े, जिल्हा पणन अधिकारी, बुलढाणा
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!