– पेपरफुटीप्रकरणाचा एसआयटीकडून सखोल तपास सुरू!
सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर फोडून सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी)ने अटक केल्या एकूण ८ आरोपींपैकी तीन आरोपींना सिंदखेडराजा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामध्ये गणेश नागरे, पवन नागरे व गणेश पालवे या आरोपींचा समावेश आहे. या आरोपींनी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने व्हायरल केल्याचा आरोप आहे. तर या गुन्ह्यातील उर्वरित पाच आरोपी हे अद्यापही न्यायालयीन कोठडीतच आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी सात आरोपींना अटक केल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवित आणखी एका आरोपीला शेंदूर्जन येथून अटक केली होती. या आठव्या आरोपीचे नाव दानिश खा फिरोज खा पठाण (वय २१) असे होते. तसेच, या गुन्ह्याची व्याप्ती पाहाता, आणखीही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आठही आरोपींची पोलिस कोठडी आज संपल्यानंतर साखरखेर्डा पोलिसांनी त्यांना सिंदखेडराजा येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आठपैकी तीन आरोपींना जामीन मंजूर करत, उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
—————-