बुलढाणा (खास प्रतिनिधी) – पिढ्या दर पिढ्या ज्यांचा शिक्षण, शाश्वत घरकुलाचा निवारा अशा कुठल्याच गोष्टींशी संबंध आला नाही, शासनाने योजना कार्यान्वित केल्या परंतु त्याचा लाभ अद्यापही मिळत नाही, असा फासेपारधी समाज उद्या (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय हक्कासाठी ‘बिर्हाड’ थाटणार आहे.
आदिवासी जमात विविध शासकीय योजनांसाठी पात्र आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांची स्वप्ने फाईलबंद झाली आहेत. त्यांच्यासाठी कार्यान्वित योजनांचा लाभ कुणीही लाटून घेतो. त्यामुळे जागृत झालेला हा समाज आता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील फासेपारधी समाज उद्या, १५ मार्च रोजी बुलढाणा जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारासमोर ‘बि-हाड आंदोलन’ करीत आहे.
कुटुंबासह साहित्य – सामानासह फासेपारधी समाज बुलढाण्यात धडकणार आहे. १६ मागण्यांसह हे आंदोलन केले जाणार आहे. त्यात कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे, विविध प्रकारचे दाखले घरबसल्या मिळावेत, आदिवासी आश्रम शाळा मंजूर करून द्यावी, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी समाजातील पंचांशी चर्चा करावी, आदिवासी विकास विभागाचे दुय्यम कार्यालय बुलढाणा मुख्यालयी करून द्यावे, यासह विविध मागण्यांचा यात समावेश आहे. संपूर्ण आदिवासी समाज बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन फासेपारधी नेते युवराज पवार, दिपू पवार, आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा नंदिनीताई टारपे, जिल्हाध्यक्षा रत्नाताई पवार, मूलनिवासी मंचचे प्रशांत सोनुने आदिंनी केली आहे.