बुलढाणा (खास प्रतिनिधी) – वाढत्या चोरींचे प्रमाण पाहता, चोरट्यांचे नेटवर्क लयभारी, असंच म्हणावे लागेल. कारण चिखलीत काल भरदिवसा शहरातील सहारा पार्क येथे दुपारी 12 वाजताच्या सुमारास प्रकाश जाधव यांच्या बंद घरातून दागिने व रोख रक्कम असा 1,45,000 रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची तक्रार आज 14 मार्चला देण्यात आली.
चिखली शहरात चोरी,घरफोडींचे प्रमाण वाढत असल्याने शहरवासी काहीसे भयभीत दिसून येत आहे. शहरातील सहारा पार्क येथील प्रकाश गणेशराव जाधव हे बाहेर गेले होते. त्यांनी सोयाबीन, हरभरा विक्री करून 90 हजार रुपये कपाटात ठेवले होते. या संधीचा फायदा घेत भर दुपारी 12 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांचे कुलूपबंद घर फोडले. कपाटातील रोख रक्कम, सोन्याच्या दागिन्यासह एकूण 1,45,000 रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला. चिखली पोलिसांनी तपासचक्र फिरविले असून चोरट्यांचा कसून शोध घेतल्या जात आहे. चिखली शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांचे नेटवर्क भारी दिसत असून पोलिसांपुढे चोरी, घरफोड्यांच्या घटना आव्हान ठरत आहे.