बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शासनाने मुला – मुलींसाठी अनेक योजनेअंतर्गत सुविधा कार्यान्वित केल्या. परंतु प्रशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करू पाहत आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज गेल्या ४ महिन्यापासून बंद असल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांच्या खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आज थेट त्यांच्या पालकांनी रुग्णालयावर धडक देत, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान, २ ते ३ दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालकांना देण्यात आले आहे.
बुलढाणा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथील नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वस्तीगृह गेल्या ४ महिन्यापासून बंद आहे. तत्पूर्वी पालकांना कॉलेजचे काम सुरू असल्याने ३ महिने लागेल असे सांगण्यात आले होते. परंतु ४ महिने उलटूनही कॉलेज सुरू झाले नाही. या विद्यालयात ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था शासन करते. मात्र कॉलेज बंद असल्यामुळे येथे शिक्षण घेणार्या सर्व मुलींची राहण्याची-खाण्याची दयनीय अवस्था झाली आहे. शिवाय, या विद्यार्थ्यांना ४ महिन्यापासून कुठलाही शासनाचा लाभ मिळाला नाही, असा आरोप पालकांनी यावेळी केला. या अनुषंगाने पालकांनी आज बहुजन विकास सेनाप्रमुख विकास नांदवे यांच्या नेतृत्वात जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेतली. भेटीदरम्यान वस्तीगृहाचे अधीक्षक व संबंधित प्राचार्य यांना दोन दिवसात पत्र देऊन हा विषय निकाली लावू असे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस यांनी दिले आहे. दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर बहुजन विकास सेनेच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विकास नांदवे यांनी यावेळी दिला.