बिबी (ऋषी दंदाले) – जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सिंदखेडराजा, लोणार, देऊळगावराजा तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारीदेखील सहभागी झाले होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही या संपात सहभागी झाल्याने शाळांत शुकशुकाट होता. तसेच, ग्रामसेवक, तलाठीदेखील संपावर असल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली होती. खडकपूर्णा पाटबंधारे विभागाचे कर्मचारीही संपात सहभागी झालेले असल्याने या प्रकल्पाचेही कामकाज बंद होते. तीनही तालुक्यांत संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.
लोणार तालुकाअंतर्गत जुनी पेंशन या प्रमुख मागणीसाठी सर्व कर्मचारी संघटना, तथा शिक्षक संघटना तथा सर्व विभागाचे कर्मचारी यांनी आपआपल्या कार्यालयात बेमुदत संपाचा वैयक्तिक अर्ज देऊन संपात सहभाग नोंदविला. तसेच १४ मार्चपासून पुकारलेल्या बेमुदत संपाचे सामूहिक निवेदन तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. सामूहिक निवेदन देण्यासाठी शिक्षण,महसूल, आरोग्य, कृषी, वनविभाग, ग्रामसेवक तथा सर्व विभागाचे सरकारी व निमसरकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. देऊळगावराजा येथील खडकपूर्णा पाटबंधारे विभागाचे कर्मचारीदेखील संपात सहभागी झाले आहेत. या कर्मचार्या फलक हातात घेऊन जुन्या पेन्शन योजनेची मागणी केली. तसेच, सरकारचा निषेध व्यक्त केला.
——————–