बुलढाणा (खास प्रतिनिधी) – कर्तव्यतत्परता असली तर, कोणतेच काम अशक्य नाही. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी कोकिळा तोमर यांनी एका चोरी प्रकरणात कसून तपास करण्याचे ठरविले व एका चोरट्याला जालना जिल्ह्यातील घनसावंगी गावातून बेड्या ठोकल्या.
बुलढाणा शहरातील अजिंठा रोडवरील रुद्राक्ष हॉटेलमध्ये कामाला असलेल्या वेटर महादू दौलत जाधव या ४७ वर्षीय इसमाने सहा महिने काम केले. मालकाचा विश्वास संपादित करून एका रात्री हॉटेल समोर उभी असलेली हॉटेल मालकाची मोटरसायकल व मोबाईल घेऊन पसार झाला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. मात्र चोरट्याचा शोध लागत नव्हता.
दरम्यान, महिला पोलिस अधिकारी कोकिळा तोमर यांनी याप्रकरणी कसून चौकशी करत सायबर विभागाची मदत घेतली. आरोपी महादू जाधव हा जालना जिल्ह्यात दडून बसला होता. या आरोपीला कोकिळा तोमर यांनी हुडकून काढले. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मोबाईल जप्त करीत, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मनात आणले तर गुन्हेगार कितीही चतुर असले तरी पोलीस त्यांचा शोध लावू शकतात, असेच काही कोकिळा तोमर यांनी करून दाखविले आहे.