बुलढाणा (खास प्रतिनिधी) – पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखली जाणाऱ्या आणि पत्रकारीता व पत्रकारांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी अनिल म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामती येथे संघटनेच्या कार्यशाळेत त्यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना आहे. सध्या २३ राज्यांत ही संघटना कार्यरत असून २२ हजारांहून अधिक सदस्य या संघटनेचे आहेत. या संघटनेच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे ११ मार्च रोजी बारामती येथे उद्घाटन करण्यात आले. बारामती क्लब येथे होत असलेल्या या कार्यशाळेच्या पहिल्याच सत्रात काही पदाधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये राज्य उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले अनिल म्हस्के हे यापुढे व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष (ग्रामीण) म्हणून काम सांभाळतील अशी घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केली. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेला समर्थन दिले. त्यानंतर संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष धमेंद्र जोरे, राजा माने, राष्ट्रीय महिला संघटक सारिका महोत्रा आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अनिल म्हस्के यांना सत्कार करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
१० ऑगस्ट २०२२ रोजी अनिल म्हस्के यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी संघटनेचे जाळे संपूर्ण विदर्भात पसरविले. तीनच महिन्यात म्हस्के यांनी आपल्या संघटन कौशल्याची छाप पाडल्याने २ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडे राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात डिसेंबर महिन्यात बुलढाण्यात व्हॉइस ऑफ मीडियाची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत पत्रकारांच्या संरक्षणाच्या दृष्टीन प्रत्यक्ष कृतीतून पहिले पाऊल उचलण्यात आले. यावेळी अडीचशे पत्रकारांना दहा लाखाचे विमा सुरक्षा कवच देण्यात आले.
अनिल म्हस्के यांच्या संकल्पनेतील आणि नियोजनातील ही योजना राज्यभर राबवण्यात येऊन चार हजारांवर पत्रकारांना वीमा सुरक्षा कवच देण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी अनिल म्हस्के यांची कार्यपद्धत आणि त्यांचातील एकंदरीत कामाचा ही बीब अलगत ओळखली आणि बारामती येथे दोन दिवसीय कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच सत्रात अनिल म्हस्के यांची संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी (ग्रामीण) नियुक्तीची घोषणा त्यांनी केली. अनिल म्हस्के यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असून मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात जिल्ह्यातील कोणत्याही पत्रकाराला राज्याचा अध्यक्ष होण्याची संधी आजवर मिळाली नाही. अनिल म्हस्के यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या पत्रकारीतेत सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली जावी, अशी ही घटना असून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अनिल म्हस्के यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणे ही जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी अभिमानाची बाब आहे.