शेतकरी अपघात विमा योजना झाली आता ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’!
बुलढाणा (संजय निकाळजे) – शेतकर्यास अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते. शेतकर्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकर्यास किंवा त्यांच्या कुटुंबास या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे आता रूपांतर करण्यात आले असून, ती योजना आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असे करण्यात आले आहे. सरकारने सादर केलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेला उजाळा देण्यात आला असून, शेतकरीभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही योजना शेतकर्यांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे, तर या योजनेच्या सानुग्रह अनुदानातही मोठी वाढ करण्यात आली आहे.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत अपघात झालेल्या शेतकरी कुटुंबाला एक लाख रुपये दिले जात होते. मात्र या योजनेत वाढ झाली आहे. या योजनेचे स्वरूपदेखील बदलण्यात आले असून, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे रूपांतर आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेमध्ये करण्यात आले आहे. पूर्वी ही योजना कंपनीच्या माध्यमातून राबविली जात होती. म्हणजेच कंपन्यांच्या माध्यमातून अपघातग्रस्त शेतकर्यांना रक्कम उपलब्ध होत होती. मात्र आता यामध्ये मोठा बदल करत ही योजना थेट राज्य सरकारकडून राबवली जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा शेतकर्यांना निश्चितच मोठा फायदा होईल.
या सोबतच विमा रकमेत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाख रुपयाची मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जात होती. मात्र आता दोन लाख रुपयांची मदत मिळणार आहे. शासनाच्या माध्यमातूनच ही मदत मिळेल. यामुळे शेतकर्यांना नाहक त्रास वाचणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभाचे प्रमाण अत्यल्प होते. अपघात झाल्यानंतर क्लेम दाखल करण्यासाठी अपघातग्रस्तांची मोठी दमछाक होत होती. पंचनामा होऊनही आवश्यक कागदपत्रासाठी विमा कंपनीकडून अपघातग्रस्तांची अडवणूक होत होती. क्लेमच्या प्रस्तावात जाणीवपूर्वक त्रुट्या काढल्या जात होत्या. त्या निस्तारण्यासाठी देखील अपघातग्रस्तांना नाहक त्रास देण्यात येत होता. त्यामुळे या योजनेअंतर्गत मिळणार्या लाभाचे प्रमाण अत्यल्प होते.
कुणाला मिळणार लाभ?
या योजनेत शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, विंचू, सर्पदंश, विजेचा शॉक बसणे, यासह नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणार्या अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अशांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल. शासनाने या योजनेच्या सानुग्रह अनुदानात वाढ केल्यामुळे त्याचा निश्चितच फायदा अपघातग्रस्त शेतकरी व कुटुंबास होणार आहे.
—————